…तर कायम पंतप्रधानांसोबत राहणार, पक्षाच्या बैठकीत ठाकरेंचं मोठं विधान!
पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे परदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या घटनेवर कोणतेही भाष्य केले नव्हते.

Uddhav Thackeray : पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे परदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या घटनेवर कोणतेही भाष्य केले नव्हते. आता मात्र ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव, काश्मीरचा मुद्दा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असू, असं ठाकरे ठामपणे म्हणाले आहेत. काश्मीर आपलं आहे आणि आपलंच आहे, असंही ठाकरेंनी म्हटलंय.
शिवसेनाभावनात घेण्यात आली बैठक
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील शिवसेनाभवनात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार, खासदार, नेते, तथा प्रमुख पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत बोलताना ठाकरेंनी वरील भाष्य केलंय.
वैचारिक मतभेद असतील पण…
गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या संघर्षावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत या संघर्षावर भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील असं ठाकरेंनी म्हटलंय. एकवेळ भाजपा देशात राहणार नाही परंतु काश्मीर देशात राहील असंही ठाकरेंनी म्हटलंय. जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा पंतप्रधानांसोबत राहू. आपले त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद असतील पण ज्यावेळी देशावर संकट येईल त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत राहू, असंही त्यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी प्रचारदौऱ्यात उतरू नये
एक देश एक निवडणूक या धोरणावर अभ्यास करणारी समिती सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यावरही त्यांनी भाष्य केलंय. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. जेव्हा निवडणुका होतात तेव्हा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यात उतरू नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेता सर्व तयारीला लागवे, असा आदेशही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.