‘पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये काय होतं?’

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:59 PM, 14 Apr 2019
'पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या 'ब्लॅक बॉक्स'मध्ये काय होतं?'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकमधील रॅलीच्या दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमधून एक ब्लॅक बॉक्स काढल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. काँग्रेसने आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेत या बॉक्सवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी संबंधित काळ्या बॉक्सवर अनेक प्रश्न उपस्थित करताना याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शर्मा म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्या चित्रदुर्गच्या रॅलीत अनोखे दृश्य पाहायला मिळाले. पंतप्रधान हेलिकॉप्टरमध्ये होते. ते हेलिकॉप्टर वायुसेनेचे होते. पंतप्रधानांसोबत वायुसेनेचे आणि विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) अधिकारीही असतात. असे असतानाही चित्रदुर्गमध्ये पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधून काळ्या रंगाचा बॉक्स काढून घाईघाईत एका खासगी गाडीत ठेवण्यात आला. त्यानंतर ती गाडीने तातडीने तेथून निघून गेली. तिचा पंतप्रधानांच्या ताफ्यात समावेश नव्हता.’

याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचेही आनंद शर्मांनी सांगितले. तसेच तत्काळ याची चौकशी करावी, अशीही मागणी शर्मांनी केली. काँग्रेसचे नेते निवडणूक प्रचारासाठी जातात तेव्हा त्यांची तपासणी होते, मग पंतप्रधान मोदींची तपासणी व्हायला नको का? असाही प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला. संबंधित काळ्या बॉक्समध्ये काय होते? तो बॉक्स कोठून आणण्यात आला? कोठे नेण्यात आला? याची माहिती जाणून घेण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे, असेही शर्मा यांना नमूद केले.

पाहा व्हिडीओ: