माढ्यातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार संजय शिंदे नेमके कोण आहेत?

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्या नावावर जवळपास निश्चिती झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. कोण आहेत संजय शिंदे? संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे. संजय शिंदे …

माढ्यातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार संजय शिंदे नेमके कोण आहेत?

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्या नावावर जवळपास निश्चिती झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.

संजय शिंदे हे मोहिते पाटील कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असून, अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू असून, माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.

2014 साली स्वाभिमानी पक्षाकडून करमाळा विधानसभा मतदार संघातून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.

संजय शिंदे हे विठ्ठल कार्पोरेशनचे संस्थापक चेअरमन असून, या माध्यमातून साखर कारखाना आणि सूतगिरणीची माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे उभारणी त्यांनी केली. माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पदही त्यांनी सांभाळलं आहे.

याआधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, तसेच माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही संजय शिंदे यांनी भूषवले आहे.

संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह मोहिते पाटील लढत?

भाजपने जर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे उमेदवार राहिले तर संजयशिंदे आणि रणजितशिंह मोहिते पाटील अशी चांगलीच रंगत होणार आहे.

माढा मतदार संघाच्या निर्मितीपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 च्या मोदी लाटेत सुद्धा या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटलांनी गड राखला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर न केल्याने नाराज असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटलांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे शरद पवारांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केले. एकीकडे त्यामुळे शरद पवारांची माघार तर दुसरीकडे मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेश यामुळे माढा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबाबतीत चर्चेला उधाण आले होते. मात्र आता संजय शिंदे यांच्या उमेदवारीने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी आता माढा मतदार संघ प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे त्यांनी मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाला शह देण्याबरोबरच राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा मास्टर प्लॅन आखल्याचे संजय शिंदे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने समोर आलं आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *