बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल

बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल


बारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्याप्रमाणेच काम करत होता. एकूणच जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप उमेदवार कांचन कुल यांनी व्यक्त केला.

विरोधी उमेदवार आम्हीच जिंकणार असं आत्मविश्वासाने सांगतात. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात ही विचार करण्यासारखी बाब असल्याचा टोला लगावत, आता कुठे गेला विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास असा सवालही कांचन कुल यांनी उपस्थित केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज बारामतीतील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला सिद्धेश्वराकडून कौल मिळालाय आणि जनताही आपल्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं.

विरोधी उमेदवार विजय निश्चित असल्याचं सांगतात. त्याचवेळी शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात. त्यावरुनच विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास काय तो कळतो असंही कांचन कुल म्हणाल्या. ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. पण जनतेने पाठबळ दिल्याने आम्हीच विजयी होऊ, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीच्या जिरायत भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांचा समावेश असलेली समिती नेमून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येथील जनतेचा पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवू शकतो, असंही कांचन कुल यांनी सांगितलं. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. त्यामुळे आतापासूनच आम्ही जनतेची प्रश्न समजावून घेऊन कामाला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या भागातील लोकांचे प्रश्न आम्ही समजावून घेत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI