सूर्य आणि शनिची 11 जानेवारीपासून या राशींना मिळणार साथ, गोचर कुंडलीतील स्थिती ठरणार लाभदायी
नववर्ष 2024 सुरु झालं असून प्रत्येक जण नव्या संकल्पासह कामाला लागलं आहे. ग्रहांची स्थितीही बदलत आहे. त्यामुळे काही जातकांची साथ मिळत आहे. तर काहींसाठी ग्रहांची प्रतिकूल ठरत आहे. असं असताना 11 जानेवारीपासून शनि आणि सूर्याची स्थिती तीन राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात काय सांगते गोचर कुंडली..

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधी एका राशीत राहिला की राशी बदल करतो. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा वेगवेगळा आहे. त्यानुसार ग्रह एकाच राशीत एकत्र येतात. कधी कधी समोरासमोर उभे ठाकतात. ग्रहांच्या मित्रत्व आणि शत्रूत्व गुणातून जातकांना फळं भोगावी लागतात. नववर्षात सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवसाला मकर संक्रांती असं संबोधलं जातं. तर शनिदेव हे कुंभ राशीत पूर्ण वर्षभर असणार आहेत. त्यामुळे या दोन ग्रहांचा संबंध कसा येणार असा प्रश्न अनेक जातकांना पडला आहे. ग्रहांच्या राशी बदलासोबत नक्षत्र गोचरही तितकाच महत्त्वाचा असतो. 11 जानेवारीला सूर्यदेव उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर शनिदेव याच दिवशी शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या बदलामुळे राशीचक्रावर परिणाम होईल. सूर्य शनि हे पितापूत्र असले तरी एकमेकांमध्ये कटुता आहे. त्यामुळे यांचं एकत्र येणं त्रासदायक असतं. पण नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी शुभदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…
या राशींना शनि सूर्याच्या स्थितीचा होणार लाभ
मेष : शनिदेव या राशीच्या 11 व्या, तर सूर्य नवव्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे नक्षत्र बदलाची स्थिती या राशीच्या जातकांना लाभदायी ठरेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कौतुकाची थाप पडेल. मुलांच्या शिक्षणातही प्रगती होत असल्याचं दिसून येईल. आर्थिक स्थिती या काळात बऱ्यापैकी सुधारेल.
सिंह : शनि या राशीच्या सातव्या, तर सूर्य या राशीच्या पाचव्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे नक्षत्र बदलाचा या राशीच्या जातकांनाही लाभ होईल. हाती घेतलेलं काम चुटकीसरशी पूर्ण कराल. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. सूर्याच्या प्रभावामुळे समाजात मानसन्मान वाढेल. प्रत्येक संकटाचा धीराने सामना करण्याचं बळ मिळेल.
तूळ : शनि या राशीच्या पाचव्या, सूर्य या राशीच्या तिसऱ्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे नक्षत्र बदलाचा या राशीवरही सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसून येईल. जे काम हाती घ्याल त्यात सहज यश मिळताना दिसेल. कौटुंबिक पातळीवर संबंध दृढ होतील. मित्रांसोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. वैवाहिक जीन आनंदात जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
