Guru Pornima 2025 : गुरू कोणाला मानावं? आणि गुरु दीक्षा घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? जाणून घ्या सविस्तर
गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देणाऱ्या गुरुजनांना समर्पित आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, गुरू कोणाला मानावं? आणि गुरु दीक्षा घेणं खरंच आवश्यक आहे का? या प्रश्नांचा उहापोह करताना आपण या पवित्र दिवसाचे खरे महत्त्व समजून घेऊया.

गुरु पौर्णिमा हा दिवस गुरुजनांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक सण नसून, तो आपल्या आयुष्यातील एका मार्गदर्शक व्यक्तीबद्दल आत्मीयतेने आठवण काढण्याचा आणि त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्याचा आहे. गुरु पौर्णिमा 2025 मध्ये 10 जुलै रोजी साजरी होणार आहे.
गुरु म्हणजे कोण?
संस्कृत भाषेत ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ आहे “अंधारातून प्रकाशाकडे नेणारा”. प्राचीन काळापासून गुरूंना ईश्वरतुल्य मानलं गेलं आहे. वेद, पुराण, महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्ये गुरूच्या महत्त्वाचं भरपूर वर्णन आढळतं. भगवान शिवांना या जगातील पहिले गुरु मानलं जातं, तर वेदव्यास यांचा जन्म ज्या दिवशी झाला, तो दिवस ‘गुरु पौर्णिमा’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिवशी गुरूंना वंदन करणं, त्यांचं स्मरण करणं आणि योग्य गुरु निवडणं विशेष महत्त्वाचं ठरतं.
गुरु का निवडावा?
गुरु हा केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रापुरता मर्यादित नसतो. आजच्या काळात तो शिक्षक, मार्गदर्शक, जीवनात प्रेरणा देणारा कुणीही असू शकतो. आपल्या जीवनाला दिशा देणारा, योग्य-अयोग्य यातील फरक स्पष्ट करणारा आणि आपण चांगल्या मार्गावर चालावं यासाठी प्रेरणा देणारा कोणताही व्यक्ती गुरु म्हणून स्वीकारला जाऊ शकतो.
श्रीकृष्णाने अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलं आहे की जसं माझी भक्ती करणं योग्य आहे, तसं गुरुची भक्ती करणंही योग्य आहे. गंगा नदी जशी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ मानली जाते, तशी गुरुसेवा सर्व शुभकर्मांमध्ये श्रेष्ठ मानली जाते.
कोणाला बनवावं गुरु?
गुरु निवडताना ‘ज्ञानदाते’चा विचार केला पाहिजे. असा व्यक्ती जो केवळ माहिती देत नाही, तर आपल्याला विचार करायला शिकवतो, योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो आणि आयुष्याला सकारात्मक वळण देतो तोच खरा गुरु! शास्त्रांनुसार, सद्गुरूची प्राप्ती होणं हे मोठं सौभाग्य मानलं जातं. फक्त कोणालाही गुरु म्हणून स्वीकारून चालत नाही, तर त्यांच्याशी प्रामाणिकपणे जोडलेलं असणं आवश्यक आहे.
गुरु दीक्षा का आवश्यक आहे?
सनातन धर्मानुसार, जो कोणी धार्मिक गुरू मानतो त्याने त्यांच्याकडून दीक्षा घेणं अत्यंत आवश्यक मानलं गेलं आहे. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की गुरु दीक्षा विना केवळ कर्म केल्याने त्याचे पुण्य मिळत नाही. उदाहरणार्थ कन्यादान, व्रत, दान, पूजाअर्चा, मंदिर बांधकाम, शिवालय किंवा जलसाठा निर्मिती अशा सर्व धार्मिक कार्यांमध्ये दीक्षा घेतल्याशिवाय फलप्राप्ती होत नाही असं स्पष्ट सांगितलं आहे.
