Navratri 2025 : यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग समोर, कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा? पाहा यादी
येत्या शारदीय नवरात्री २०२५ साठीचा रंगांचा संपूर्ण मार्गदर्शक येथे आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्सवात दररोज एक विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे. या लेखात प्रत्येक दिवशी कोणता रंग घालायचा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे.

नवरात्र म्हटलं की गरबा, दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याची एक वेगळी गंमत असते. येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु होणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वीच आता नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे. चला तर मग, यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे, याची आपण माहिती घेणार आहोत.
शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो. हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे. या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते. या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो. हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून, त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे. यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जातो. या नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे म्हटले जाते.
नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग?
22 सप्टेंबर 2025 (सोमवार) – पांढरा रंग
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.
23 सप्टेंबर 2025 (मंगळवार) – लाल रंग
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल हा रंग आवड, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे.
24 सप्टेंबर 2025 (बुधवार) – निळा
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. विश्वासाचं, श्रद्धेचं प्रतिक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते.
25 सप्टेंबर 2025 (गुरुवार) – पिवळा
चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
26 सप्टेंबर 2025 (शुक्रवार) – हिरवा
पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.
27 सप्टेंबर 2025 (शनिवार) – राखाडी
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो.
28 सप्टेंबर 2025 (रविवार) : केशरी
सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. केशरी रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.
29 सप्टेंबर 2025 (सोमवार) – मोरपंखी
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे.
30 सप्टेंबर 2025 (मंगळवार) : गुलाबी
नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे.
