श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई
हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये श्रावणात येणाऱ्या एकादशीच्या उपवासादरम्यान काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. चला तर मग श्रावणातील पुत्रदा एकादशीला कोणत्या गोष्टी करण्यास सक्त मनाई आहे ते आापण जाणून घेऊयात.

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. तर वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी पुत्रदा एकादशीला विशेष स्थान दिले जाते. तसेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची श्रद्धेने पूजा, व्रत आणि उपवास करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पुत्रदा एकादशीचे व्रत संततीसुख, कुटुंबाचे कल्याण आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी केले जाते. पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 23 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2.00 वाजता सुरू होईल आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 18 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशीचा उपवास 23 ऑगस्ट रोजी केला जाईल. तर धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीच्या दिवशी या 5 गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग त्या पाच गोष्टीं कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
पुत्रदा एकादशीला भात का खाल्ला जात नाही?
धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन करू नये. असे मानले जाते की, या दिवशी सात्त्विक आहाराचे पालन करून भगवान विष्णूची आराधना करावी. यामुळेच केवळ उपवास करणारेच नव्हे, तर उपवास न करणाऱ्यांनाही या दिवशी भात टाळण्याचा सल्ला दिला जातो.
तुळशीची पाने तोडू नका
एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीला तुळशीची पाने तोडणे टाळावे. पूजेसाठी तुळशीची गरज असल्यास, एक दिवस आधीच पाने तोडावीत. तुळशीचे रोप भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष आदर देऊन तिची पूजा करण्याची परंपरा आहे.
केस आणि नखे कापणे टाळा
पुत्रदा एकादशीच्या दिवशी केस आणि नखे कापणे देखील निषिद्ध मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार एकादशी हा उपासना आणि आत्मसंयमाचा दिवस मानला जातो. त्यामुळे, या दिवशी अशा शारीरिक हालचाली टाळण्याची प्रथा आहे. जर केस किंवा नखे कापण्याची गरज असेल, तर ते एकादशीच्या आधी किंवा नंतर कापावीत.
कोणत्याही प्राण्याला मारू नका किंवा इजा पोहोचवू नका
एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्राण्याला इजा करणे किंवा मारणे धार्मिकदृष्ट्या चुकीचे मानले जाते. या दिवशी अहिंसेचे पालन करण्याचा आणि सर्व प्राण्यांबद्दल करुणा बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
कोणत्याही प्रकारचे वाईट आणि गैरकृत्य टाळा
एकादशीच्या उपवासात केवळ आहाराचे नियमच नव्हे, तर वर्तन आणि विचारांमध्येही संयम पाळणे आवश्यक असते. त्यामुळे, खोटे बोलणे, इतरांचा अपमान करणे, वाद घालणे, फसवणूक करणे किंवा इतरांना इजा पोहोचवणे यांसारख्या कृती टाळल्या पाहिजेत.
पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व
पुत्रदा एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हा उपवास केल्याने संततीची इच्छा पूर्ण होते आणि कुटुंबात आशीर्वाद व समृद्धी येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
