भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले, रवी शास्त्रींचीही लवकरच सुट्टी?

पुढच्या महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येत आहे. सहयोगी स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा समावेश आहे.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले, रवी शास्त्रींचीही लवकरच सुट्टी?

मुंबई : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही पुन्हा नव्याने अर्ज करुन संपूर्ण प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. कारण, पुढच्या महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येत आहे. सहयोगी स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

विश्वचषकातील कामगिरीबाबत क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएकडून कर्णधार आणि प्रशिक्षकासोबत बातचीत केली जाणार आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना काही प्रश्नांची उत्तरंही द्यावी लागू शकतात. भारतीय संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली, मात्र न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. प्रशिक्षकपदासाठी पुन्हा नव्याने संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. कर्णधार विराट कोहलीचे अत्यंत विश्वासू असणारे रवी शास्त्री यांनाच पुन्हा संधी दिली जाते, की नवा चेहरा शोधला जातो हा महत्त्वाचा विषय आहे. बीसीसीआय यावेळी काही तरी कठोर निर्णय घेणार असल्याचीही चर्चा आहे.

भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोबत असतील. 3 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात होणाऱ्या या दौऱ्यासाठी रवी शास्त्रींचा करार 45 दिवसांसाठी वाढवण्यात आलाय. पण भारतीय संघाला नवा फिजिओ आणि ट्रेनर मिळणं निश्चित आहे. कारण, शंकर बासू आणि पॅट्रिक फरहार्ट यांनी भारतीय संघाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशात 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. रवी शास्त्रींना अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी त्यापूर्वी ऑगस्ट 2014 ते जून 2016 पर्यंत भारतीय संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिलं होतं. प्रशिक्षक असताना रवी शास्त्रींच्या काळात आयसीसीची एकही मोठी मालिका जिंकता आली नाही. मात्र वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन यजमान संघाविरुद्ध पहिली कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास रचला होता.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेंथ और कंडिशनिंग कोच आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रशिक्षक पदासाठी विविध दिग्गज खेळाडू अर्ज करण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *