धवनकडून सासरवाडीत यजमानांची धुलाई, तरीही भारताचा पराभव

धवनकडून सासरवाडीत यजमानांची धुलाई, तरीही भारताचा पराभव

ब्रिस्बेन : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अटीतटीच्या या सामन्यात भारताचा विजय जवळपास निश्चित होता, पण रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना अखेरच्या षटकांमध्ये बाद करत स्कॉट स्टॉईनिसने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियातील गाबा मैदानावर झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारतासमोर 17 षटकात 174 धावांचं आव्हान होतं. सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्याकडून विजयी समारोप करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला.

ऑस्ट्रेलियाने 17 षटकात चार बाद 154 धावा केल्या होत्या. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी 17 षटकांमध्ये 174 धावांची गरज होती. रोहित शर्माच्या रुपाने पहिलाच धक्का लागला. त्यानंतर केएल राहुल आणि विराटही स्वस्तात माघारी परतले, ज्याचा परिणाम भारताला पराभव स्वीकारावा लागला.

सासरवाडीत शिखर धवन चमकला

गेल्या अनेक दिवसांपासून लय बिघडलेल्या शिखर धवनने ऑस्ट्रेलियात सुरुवातीच्या सामन्यातच धमाका केला. त्याने 42 चेंडूत 76 धावा केल्या. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर धवनवर मोठी जबाबदारी आली. त्याने ही जबाबदारी पार पाडत भारताला विजयाच्या जवळ नेलं. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताला वेळीच रोखत सामन्यावर वर्चस्व मिळवलं.

भारतीय संघाने नोव्हेंबर 2017 पासून आतापर्यंत खेळलेल्या सात टी ट्वेण्टी मालिका जिंकल्या आहेत. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. पण यावेळी पहिल्याच सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.

ऑस्ट्रेलियाचा सातत्याने पराभव

जूनमध्ये इंग्लंडकडून पराभव, तर झिम्बाब्वेमध्ये टी-20 सीरीजच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव, यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्धची सीरीज 3-0 ने पराभूत, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव, असे एकामागोमाग एक पराभव ऑस्ट्रेलियन संघाला पचवावे लागले आहेत. पण आता होमग्राऊंडवर मिळालेल्या या विजयामुळे निश्चितच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं मनोबल उंचावणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI