Champions Trophy 2025 : पहिल्या मॅचमध्येच पाकिस्तानचा THE END ? सुरू होताच खेळ संपणार , काय आहे गणित
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला आजपासून सुरूवात होत असून पहिली मॅच ही यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलँडच्या संघादरम्यान कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. यापूर्वी ही टूर्नामेंट 2017 साली झाली आणि तेव्हा पाकिस्ताननेच विजेतेपद पटकावलं होतं, पण यंदा मात्र पाकिस्तानसाठी आव्हान पासं सोपं नसेल.

2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानमद सध्आ पाकिस्तानकडे असून ही टूर्नामेंट हायब्रीड मोडमध्ये खेळवण्यात येणार आहे. आजपासून या स्पर्धेला सुरूवात होत असून पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. उत्तम खेळ करून या स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. पण न्यूझीलंडला घरच्या मैदानात हरवणं पाकिस्तानसाठी सोपं नसेल. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचा खेळ सुरू होताच संपू शकतो.
पहिल्या मॅचमध्येच पाकिस्तानचा THE END ?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाने सुरुवात करणे पाकिस्तानसाठी खूप कठीण जाणार आहे. खरंतर, अलीकडेच पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका खेळवण्यात आली. ज्यामध्ये न्यूझीलंडनेही सहभाग घेतला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोनदा आमनेसामने आले आणि दोन्ही वेळा किवी संघाने विजय मिळवला होता. एवढेच नाही तर या तिरंगी मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर झाला. त्यामुळे या स्टेडिअममधील परिस्थिती, वातावरण याची किवी खेळाडूंनाही चांगलीच जाण आहे, जे पाकिस्तानला महागात पडू शकते.
आज सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यास तो पहिल्याच दिवसापासून स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. या स्पर्धेत फक्त 8 संघ आहेत तर एका गटात फक्त 4 संघ आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तानने पहिला सामना गमावला तर उर्वरित दोन सामने त्यांच्यासाठी करो या मरो असे असतील. खरंतर, कोणत्याही संघाला उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी 3 पैकी किमान 2 सामने जिंकावे लागतील. तर न्यूझीलंडनंतर पाकिस्तानचे पुढचे 2 सामने हे भारत आणि बांगलादेशविरुद्ध असतील. त्यामुळे पाकिस्तानला केवळ हे सामने जिंकावे लागणार नाहीत, तर रन रेटची सुद्धा काळजी घ्यावी लागेल, जे त्यांच्यासाठी कठीण होऊ शकतं.
पाकिस्तानची भीतीदायक आकडेवारी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा चौथा सामना असेल. याआधी दोन्ही संघांमध्ये 2000, 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सामने झाले आहेत. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. याचा अर्थ असा की आज होणाऱ्या या सामन्यातही न्यूझीलंडचाच वरचष्मा असणार आहे, जे पाकिस्तानसाठी अजिबात चांगले लक्षण नाही. न्यूझीलंडने आपला दबदबा कायम राखला तर पाकिस्तानला स्पर्धेत प्रगती करणे फार कठीण जाईल.