Icc Champions Trophy 2025 : 19 दिवस, 15 सामने, 8 संघ आणि 1 कप, 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, कोण जिंकणार?
Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 'रन'संग्रामाला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेबाबत एका क्लिकवर सर्वकाही जाणून घ्या.

अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या काही तासांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा थरार 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान रंगणार आहे. एकूण 8 संघांमध्ये 19 दिवसांमध्ये 15 सामन्यांचा थरार रंगणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार ए आणि बी ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. लाहोर, रावळपिंडी आणि कराचीत हे सामने खेळवण्यात येणार आहे. तर टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत खेळवण्यात येणार आहेत. गतविजेत्या पाकिस्तानसमोर ही ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे.
साखळी फेरीत प्रत्येक संघ 3 सामने खेळणार
1 गटात 4 संघ आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. यजमान पाकिस्तानचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच न्यूझीलंड कसा सामना करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. दोन्ही संघ ट्राय सीरिजनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत.
भारताचा 20 फेब्रुवारीला सामना
टीम इंडियाचा या मोहिमेतील पहिला आणि या स्पर्धेतील एकूण दुसरा सामना हा 20 नोव्हेंबरला असणार आहे. टीम इंडिया आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. तर टीम इंडियाचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
8 संघ आणि 2 गट
ए ग्रुप : टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड
बी ग्रुप : अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड
बाद फेरीतील सामने
19 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. मंगळवार 4 मार्च आणि बुधवार 5 मार्चला अनुक्रमे उपांत्य फेरीतील पहिला आणि दुसरा सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ए ग्रुपमधील नंबर 1 टीम विरुद्ध बी ग्रुपमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघ आमनेसामने असणार आहे.
तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बी ग्रुपमधील नंबर 1 टीम आणि ए ग्रुपमधील दुसऱ्या स्थानी असलेल्या संघात अंतिम फेरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. तर रविवारी 9 मार्चला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.