AFG vs ENG : अफगाणिस्तानने विजय मिळवल्यानंतर कॅप्टन हशमतुल्ला शाहिदीकडून विजयाचं श्रेय कुणाला?
Icc Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान 325 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरली. अफगाणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी मात केली. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी विजयानंतर एकच जल्लोष केला.

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने करो या मरो अशा सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम राखलंय. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचं आव्हान संपुष्ठात आलं. अफगाणिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 326 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडनेही प्रतिकार करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. मात्र 49.5 व्या बॉलवर आदील रशीद आऊट झाला आणि इंग्लंडचा डाव हा 317 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने अशाप्रकारे इंग्लंडला पराभवाची धुळ चारली आणि स्पर्धेतून बाहेर केलं. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने आनंद व्यक्त केला. शाहिदीने विजयानंतर काय म्हटलं? तसेच कुणाला श्रेय दिलं? हे जाणून घेण्याआधी आपण सामन्यात काय झालं? हे थोडक्यात जाणून घेऊयात.
सामन्याचा धावता आढावा
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र इंग्लंडने 37 धावांपर्यंत 3 झटके देत अफगाणिस्तानला बॅक फुटवर ढकललं. अफगाणिस्तानने तिथून कमबॅक केलं आणि 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 325 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानला 300 पार पोहचवण्यात इब्राहीम झाद्रान याने निर्णायक भूमिका बजावली. इब्राहीमने 177 धावा केल्या. तसेच कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी आणि मोहम्मद नबी या दोघांनी प्रत्येकी 40-40 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई याने 41 धावा जोडल्या.
त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान याच ओमरझई याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी याने दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर इतरांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली, ज्यामुळे इंग्लंडला 8 धावांआधी रोखून विजय मिळवता आला.
विजयानंतर कर्णधाराची प्रतिक्रिया
“आम्ही एक टीम म्हणून आनंदी आहोत. आमचा देश या विजयाने आनंदी असेल. आम्ही इंग्लंडला 2023 साली पहिल्यांदाच हरवलं. आम्ही दिवसेंदिवस सुधारणा करत आहोत. आजचा सामना आव्हानात्मक होता. आम्ही त्यावर चांगले नियंत्रण ठेवलं. मी निकालामुळे आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया हशमतुल्लाहने सामन्याबाबत दिली.
इब्राहीम झाद्रानबाबत म्हणाला…
“झाद्रान एक प्रतिभावान खेळाडू आहे. आम्ही सुरुवातीला 3 विकेट्स गमावल्याने पिछाडीवर होतो आणि दबाव होता. माझ्या आणि त्याच्यातील भागीदारी महत्त्वाची होती. मी पाहिलेल्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळींपैकी एक अशी झाद्रानची खेळी होती. अझमतने चांगली खेळी केली. सकारात्मक हेतूने खेळलो. अझमतने निर्णायक क्षणी बॉलिंगही केली”, अशा शब्दात कर्णधाराने झाद्रानचं कौतुक केलं.
युवा खेळाडूंची भूमिका
“आमच्याकडे प्रतिभावान तरुण आणि काही वरिष्ठ खेळाडू आहेत. सर्वांना त्यांची भूमिका माहित आहे. प्रत्येक जण चांगलं करतोय.आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध असंच चांगलं करु, अशी आशा आहे. यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळेल तो सामना सेमीफायनलमध्ये कोण जाणार? हे ठरवेल. आम्ही त्या दिवशी सर्वोत्तम प्रयत्न करु”, असंही कर्णधाराने म्हटलं.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.
