PAK vs OMAN : पाकिस्तानची विजयी सुरुवात, ओमानवर 93 धावांनी मात, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप
Pakistan vs Oman Match Result Asia Cup 2025 : पाकिस्तानने नव्या ओमानवर मोठा विजय मिळवत आशिया कप स्पर्धेत दमदार सुरुवात केली. पाकिस्तानने ओमानचा 93 धावांनी धुव्वा उडवला.

आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात ओमान विरुद्ध एकतर्फी आणि मोठा विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. पाकिस्तानने ओमानसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ओमान पाकिस्तानला टफ फाईट देईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. ओमानने तशी सुरुवातही केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानने झटपट झटके देत ओमानला गुंडाळलं. ओमानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने ओमानला 20 बॉलआधीच ऑलआऊट केलं. पाकिस्तानने ओमानला 16.4 ओव्हरमध्ये 67 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 93 धावांनी सामना खिशात घातला.
पाकिस्तानने ओमनाला 2 धावांवर पहिला झटका दिला. कर्णधार जतिंदर सिंह 1 धाव करुन आऊट झाला. मात्र त्यानंतर आमिर कलीम आणि हम्माद मिर्झा या दोघांनी 22 धावांची भागीदारी केली. त्यामुळे चाहत्यांची आशा वाढली. मात्र पाकिस्तानने त्यानंतर ओमानला झटपट झटके दिले आणि ओमानच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. ओमानच्या फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
हम्माद मिर्झा याने सर्वाधिक धावा केल्या. मिर्झाने 23 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 27 धावा केल्या. आमिर कलीमने 13 धावा केल्या. तर शकील अहमदने 10 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त एकालाही काही खास करता आलं नाही. ओमानने या सामन्यातून आशिया कप स्पर्धेत पदार्पण केलं. ओमानला विजय मिळवता आला नाही. मात्र ओमानने चिवटपणे झुंज दिली. पाकिस्तानसाठी एकूण 6 जणांनी गोलंदाजी केली. पाकिस्तानचे सहाही गोलंदाज यशस्वी ठरले. सॅम अयुब, सुफीयान मुकीम आणि फहीम अश्रफ या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शाहीन अफ्रीदी, अब्रार अहमद आणि मोहम्मद नवाझ या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
पाकिस्तानची पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप
पाकिस्तानला या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. पाकिस्तानने ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तान या सामन्याआधी तिसऱ्या स्थानी होती. ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानचा नेट रनरेट हा +4.650 असा आहे. तर टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. भारताचा नेट रनरेट हा +10.483 इतका आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला
दरम्यान आता 14 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून सुपर 4 मधील प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
