IND vs AUS : मालिकेचा शेवट गोड करण्यात टीम इंडियाला अपयश, ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना 66 धावांनी जिंकला
IND vs AUS 3rd Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. मात्र शेवट काही गोड करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करत सामना 66 धावांनी जिंकला.

मुंबई : ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत व्हाईटवॉश देण्याच्या हेतूने भारतीय संघ मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात टीम इंडियाला अपयश आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात तिसरा सामना खेळला गेला. तसेच दिग्गज खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं होतं. मात्र सामना जिंकून देणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत खेळपट्टीचा अंदाज असल्याने फलंदाजी स्वीकारली. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 गडी गमवून 352 धावा केल्या. या धावा गाठणं टीम इंडियासमोर मोठं आव्हान होतं. टीम इंडिया सर्वबाद 286 धावापर्यंत मजल मारू शकली. टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव झाला. मालिका भारताने 2-1 ने जिंकली, पण शेवट गोड करण्यात अपयश आलं.
ऑस्ट्रेलियाचा डाव
ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन यांनी चांगली खेळी केली. चौघांना अर्धशतक झळकावलं. मिचेल मार्शचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. या खेळाडूंच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 352 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांना या खेळाडूंना झटपट बाद करण्यात अपयश आलं. पाटा पिच असल्याने चेंडूही टप्प्यात येत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
भारताचा डाव
विजयी आव्हान गाठण्यासाठी रोहित शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी मैदानात उतरली. एकीकडे रोहित शर्मा आक्रमक खेळी करत होता. तर दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरला सूर गवसत नव्हता. 30 चेंडूत 18 धावा करून वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रोहित आणि विराटने चांगली भागीदारी केली. पण रोहितचं दुर्दैव म्हणावं की मॅक्सवेल सुदैव असा प्रकार घडला. रोहितने जोरात मारलेला फटका मॅक्सवेलच्या हातात बसला आणि मॅच फिरली.
भारताकडून रोहित शर्माने 57 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आमि 6 षटकारांचा समावेश आहे. तर विराट कोहलीने 56 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं.
भारत-ऑस्ट्रेलिया संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा
