IND vs PAK: Bcci कडून टीम इंडियासाठी इतक्या कोटींचं बक्षिस जाहीर, प्रत्येकाला किती रक्कम मिळणार?
Bcci Prize Money For Asia Cup 2025 Winner Team India : बीसीसीआयने आशिया कप विजेत्या भारतीय संघासाठी 21 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा 17 व्या टी 20 आशिया कप स्पर्धेतील एकूण आणि सलग सातवा तसेच पाकिस्तान विरुद्धचा तिसरा विजय ठरला. भारताने यासह टी 20I आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची आशिया कप जिंकण्याची नववी वेळ ठरली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामिगिरीनंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतासाठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने पेटारा उघडला
बीसीसीआयने आशिया कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने 21 कोटी रुपये बक्षिस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलंय. बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंना स्थान दिलं होतं. तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, बॉलिंग-बॅटिंग आणि फिल्डिंग कोच असे एकूण 5 सदस्य आहेत. अशाप्रकारे टीम इंडियाचे 15 खेळाडू आणि 5 सपोर्ट स्टाफमधील सदस्य असे मिळून हा आकडा 20 होतो. त्यामुळे प्रत्येकाला 1 कोटी रुपये मिळतील, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच ही रक्कम कमी जास्त होऊ शकते. मात्र बीसीसीआयच्या या निर्णयामुळे खेळाडू आणखी मालामाल होतील इतकं मात्र निश्चित आहे.
भारताने सामना असा जिंकला
पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहाने याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर फखर झमान याने 46 धावांचं योगदान दिलं. सॅम अयुबने 14 धावा जोडल्या. तर टीम इंडियाने इतरांना झटपट गुंडाळलं. टीम इंडियाने पाकिस्तानचं अशाप्रकारे 19.1 ओव्हरमध्ये 146 रन्सवर पॅकअप केलं.
टीम इंडियाची 147 धावांच्या प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात राहिली. भारताने 20 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे या त्रिकुटाने निर्णायक खेळी करत भारताला विजयी केलं. तिलकने संजूसह चौथ्या आणि शिवमसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयी केलं. संजूने 24 आणि शिवमने 33 धावा केल्या. तर तिलक वर्मा विजयी करुन नाबाद राहिला. तिलकने नाबाद 69 धावांची खेळी केली. भारताने 2 बॉलआधी 5 विकेट्स गमावून हा सामना जिंकला आणि सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला.
बीसीसीआयकडून बक्षिस रक्कम जाहीर
3 blows. 0 response. Asia Cup Champions. Message delivered. 🇮🇳
21 crores prize money for the team and support staff. #AsiaCup2025 #INDvPAK #TeamIndia pic.twitter.com/y4LzMv15ZC
— BCCI (@BCCI) September 28, 2025
भारत सर्वात यशस्वी संघ
दरम्यान टीम इंडियाची आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची स्पर्धेच्या इतिहासातील नववी वेळ ठरली. टीम इंडियाने याआधी 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकला होता. तर आता भारताने सूर्याच्या नेतृत्वात ही ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलंय.
