Asia Cup : यूएईला कोण जाणार? मंगळवारी मुंबईत ठरणार, 15 खेळाडूंचा निवड समिती निकाल लावणार
Team India Squad For Asia Cup 2025 : टीम इंडिया अनेक वर्षांनंतर यंदा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांशिवाय आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. मंगळवारी 19 ऑगस्टला या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. जाणून घ्या.

प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याच्याच प्रतिक्षेत आहे. आशिया कप स्पर्धेत कुणाला संधी मिळणार? हे उत्सुकता वाढवणार सर्वात मोठं कारण आहे. कारण भारतीय संघात तोडीसतोड युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या असंख्य खेळाडूंपैकी मोजक्या आणि निवडक 15 खेळाडूंचीच निवड करण्याचं आव्हान निवड समितीसमोर आहे. त्यामुळे कोण कोणत्या स्थानी खेळणार? कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं भारतीय चाहत्यांना येत्या काही तासांमध्येच मिळणार आहेत.
मुंबईतील बैठकीनंतर घोषणा
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची मंगळवारी 19 ऑगस्टला घोषणा होणार आहे. मात्र बीसीसीआयकडून सोशल मीडियाद्वारे भारतीय संघाची घोषणा केली जाणार नाही. तर निवड समिती प्रमुख अजित आगरकर हे एक एक करुन या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची नावं वाचून दाखवणार आहेत.
सूर्यकुमार यादव कॅप्टन!
आशिया कप स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण असणार? हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चाहत्यांसह, निवड समिती आणि भारतीय संघासाठी हा मोठा दिलासा आहे. सूर्यकुमार यादव हाच या स्पर्धेत भारताचं नेतृ्त्व करणार आहे. सूर्या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. सूर्यावर आयपीएल 2025 नंतर शस्त्रक्रिया झाली होती. सूर्यानंतर त्यानंतर रिहॅब केलं. तसेच एनसीएकडून सूर्या फिट असल्याचं जाहीर करण्यात आल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
8 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस
आशिया कप 2025 स्पर्धेतील सामने हे 20 षटकांचे असणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात 8 संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यानुसार साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामने खेळणार आहे. त्यानंतर सुपर 4 फोर फेरीला सुरुवात होईल. सुपर 4 मधील 2 अव्वल संघात 28 सप्टेंबरला अंतिम सामना होईल. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईतील दुबई आणि अबुधाबी क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?
भारतीय संघ आशिया कप मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार आहे. भारत पहिल्याच सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार आहे. त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला सामना होईल. तर भारताचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध होणार आहे.
टीम इंडिया सर्वात यशस्वी
दरम्यान भारताने तब्बल 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताने सुनील गावसकर यांच्यात नेतृत्वात पहिल्यांदा 1984 साली आशिया कप ट्रॉफी उंचावली होती. भारताने त्यानंतर 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकला होता.
