“मला वाटत नाही की…”, टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी राहुल द्रविडची प्रतिक्रिया
टी20 वर्ल्डकप स्पर्धा ही मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कारकिर्दीचा शेवट असणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. यावेळी त्याने मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या प्रशिक्षपदाच्या कारकिर्दिचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपताच राहुल द्रविड या पदावरून पायउतार होणार आहे. राहुल द्रविडनेही दुसऱ्यांदा कार्यकाळ वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या पदासाठी आधीपासून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये रवि शास्त्री यांच्या जागी राहुल द्रविड याने पदभार स्वीकारला होता. त्याचा दोन वर्षांच्या कार्यभार वनडे वर्ल्डकप स्पर्धेत संपुष्टात आला होता. या स्पर्धेत टीम इंडिया अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अशीच काहीशी स्थिती राहिली. पण टीम इंडियाने आशिया कप जिंकला आहे. मात्र आयसीसी चषकांचा दुष्काळ काही दूर करता आला नाही. आता राहुल द्रविडच्या कार्यकाळातील आयसीसी चषकाची शेवटची संधी आहे.
“प्रत्येक स्पर्धा माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक गेम माझ्या प्रशिक्षपदासाठी तितकाच महत्त्वाचा होता. त्यामुळे त्यात काही फरक नाही. त्यामुळे शेवटची स्पर्धा असल्याने वेगळं काही आहे असं नाही.”, असं टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने सांगितलं. “मी माझ्या कामावर प्रेम करतो. मला टीम इंडियाला कोचिंग करताना आनंद मिळाला. मी टीमसोबत काम करताना वेगळीच अनुभूती आली. दुर्दैवाने तुम्हाला माहीत आहे की फक्त वेळापत्रक आणि माझ्या आयुष्यातील ज्या टप्प्यावर आहे, त्यामुळे मला वाटत नाही की मी पुन्हा अर्ज करू शकेन.”, असंही राहुल द्रविडने सांगितलं.
“माझ्या कारकिर्दितील ही शेवटची स्पर्धा आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्यासाठी काही वेगळं नाही. मी या पदावर आल्यापासून प्रत्येक खेळ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यात काही बदल नाही.”, असं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने पुढे सांगितलं.
राहुल द्रविडच्या कारकिर्दीत टीम इंडिया दुसऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सामोरं जात आहे. मागच्या वेळेस 2022 मध्ये टीम इंडियाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. दुसरीकडे, राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत असताना बीसीसीआयने परदेशी प्रशिक्षकांशी कोणताही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.
