लैंगिक शोषण प्रकरणात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमविरोधात गुन्हा दाखल, लाहोर कोर्टाचा दणका

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार आणि संघाचा प्रमुख फलंदाज बाबर आझमच्या (Babar Azam) अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:26 AM, 15 Jan 2021
लैंगिक शोषण प्रकरणात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमविरोधात गुन्हा दाखल, लाहोर कोर्टाचा दणका

लाहोर : पाकिस्तानी क्रिकेट टीमचा (Pakistan Cricket Team) कर्णधार आणि संघाचा प्रमुख फलंदाज बाबर आझमच्या (Babar Azam) अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बाबर आझमने लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. दरम्यान याप्रकरणी लाहोर कोर्टाने बाबरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मूळची लाहोर येथील रहिवासी असलेली महिला हमीजा मुख्तार (Hamiza Mukhtar) हिने बाबरविरोधात लैंगिक शोषण आणि गर्भपातासह लग्नाचं खोटं वचन देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला होता. (Court Orders FIR Against Pakistan Captain Babar Azam In Sexual Harrasment case)

हमीजा हिने नोव्हेंबर 2020 मध्ये बाबर आझमविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला होता. आपल्या तक्रारीत तिने म्हटलं होतं की, लग्नाची खोटी वचनं देऊन बाबरने तिचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच या संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर त्याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते. PTI ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार याचिकाकर्त्या महिलेने वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली आहेत. लाहोरच्या कनिष्ठ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नोमान मुहम्मद नईम यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नसीराबाद पोलीस ठाण्याला याप्रकरणी ताबडतोब एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बाबरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमीजाने कोर्टात दावा केला होता की, “तिने कोर्टाचे आदेश येण्यापूर्वी नसीराबाद पोलीस ठाण्यात बाबरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा बाबरने पुन्हा एकदा तिला लग्नाचं वचन दिलं आणि अर्ज मागे घेण्याची जबरदस्ती केली”. आता कोर्टाच्या आदेशांनंतर बाबरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमीजा हिने काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “बाबर आझम आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटर नव्हता तेव्हापासून त्या दोघांचे संबंध होते. 2014 मध्ये त्याची पाकिस्तानी क्रिकेट संघात निवड होताच त्याच्या वागण्यात बदल झाला. त्यानंतर मी त्याला लग्नाबाबत विचारणा केली, परंतु त्याने त्यास स्पष्टपणे नकार दिला. 2016 मध्ये जेव्हा मी त्याला सांगितले की, मी गर्भवती आहे, त्यानंतर त्याचं वागणं खूपच बदललं. तो विचित्रपणे वागू आणि वागवू लागला. त्याने माझा छळ सुरु केला. मी माझ्या कुटुंबियांना याबाबत सांगितले नाही, कारण आम्ही दोघे घरातून पळून आलो होतो.”

पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड काय कारवाई करणार?

दरम्यान, कोर्टाच्या आदेशांनंतर बाबरच्या वतीने याप्रकरणी कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. परंतु हे प्रकरण बाबरच्या अंगाशी येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या तो त्याला झालेल्या दुखापतीमधून सावरतोय आणि या महिन्याच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. या मालिकेसाठी आज (शुक्रवारी) पाकिस्तानी संघाची घोषणा होणार आहे. अशातच आता कोर्टाच्या आदेशानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड बाबरविरोधात काय अॅक्शन घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Bhandara District hospital fire | भंडारा घटनेवर शोएब अख्तर हळहळला, पाकिस्तानी फॅन्स म्हणाले…

जगातील सर्वात घातक गोलंदाज कोण? शोएब अख्तरने घेतलं भारतीय खेळाडूचं नाव

(Court Orders FIR Against Pakistan Captain Babar Azam In Sexual Harrasment case)