बांगलादेशातील घटनांमुळे क्रिकेटपटू शिखर धवनचं मन व्यथित, स्पष्टच म्हणाला..
बांगलादेशातील हिंसक घटनांमुळे भारतीयांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारन या घटनांना निषेध व्यक्त केला आहे. इतकंच काय तर विविध पातळ्यांवर बांगलादेशला धडा शिकवला जात आहे. असं असताना बांगलादेशातील घटनांवर माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने परखड मत मांडलं आहे.

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद भारतात उमटताना दिसत आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर वाढत्या हिंसाचारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे अल्पसंख्यांक समुदाय भीतीच्या सावटाखाली आहे. असं असताना बांगलादेशातील हिंसाचार काही केल्या कमी होताना दिसत नाही. मानवाधिकार संघटनांच्या मते, गेल्या काही महिन्यांत अशा शेकडो घटना घडल्या आहेत. यात हल्ले, लूटमार आणि लैंगिक अत्याचार यांचा समावेश आहे. याबाबत माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत एका स्त्रीवरील क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. कुठेही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध असा हिंसाचार सहन केला जाऊ शकत नाही. पीडित महिलेला न्याय मिळावा अशी प्रार्थना शिखर धवनने केली आहे.
शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं की, “बांगलादेशमध्ये एका हिंदू विधवेवर झालेल्या क्रूर हल्ल्याबद्दल वाचून मन हेलावून जाते. कोणाविरुद्धही, कुठेही असा हिंसाचार अस्वीकार्य आहे. पीडितेला न्याय आणि पाठिंबा मिळावा यासाठी प्रार्थना करतो .”धवनच्या प्रतिक्रियेनंतर, अनेक चाहते आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही त्याच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. बांगलादेशातून अनेक दुःखद घटना समोर आल्या आहेत. यात एका विधवेवर सामूहिक बलात्कार , तिचे केस कापणे आणि तिला झाडाला बांधणे या क्रूरतेचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत सहा जणांची हत्या करण्यात आली आहे. यात व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांचा समावेश आहे.
Heartbreaking to read about the brutal assault on a Hindu widow in Bangladesh. Such violence against anyone, anywhere is unacceptable. Prayers for justice and support for the survivor. 🙏
— Shikhar Dhawan (@SDhawan25) January 7, 2026
शिखर धवनने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलं आहे. असं असलं तरी जगभरातील अनेक लीगमध्ये खेळतो. गेल्या वर्षी कॅनडा सुपर 60 मध्ये सहभागी झाला होता. व्हाईट रॉक वॉरियर्स संघाचा भाग होता. दुसरीकडे, बांगलादेशी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये स्थान देऊ नये यासाठी आवाज उचलला गेला. त्यानंतर बीसीसीआयच्या आदेशानंतर बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्ताफिझुर रहमान याला आयपीएलमधून डच्चू देण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही देश आमनेसामने आले आहेत.
