धोनीच्या संघाला टी20 वर्ल्डकप विजयानंतर मिळाले होते इतके पैसे, तुलनेत रोहितसेना ठरली भारी! जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बक्षिसाच्या रुपाने कोट्यवधि रुपयांची उधळण होत आहे. असं असताना 1983 वनडे वर्ल्डकप विजेता संघ आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप संघाला किती रुपये मिळाले होते असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला तर मग आज त्याचं उत्तर जाणून घेऊयात

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं. या विजयासह टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेत एकही सामना न गमवता टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मुंबईत तर खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांचा जनसागर लोटला होता. बीसीसीआयने खेळाडूंचा सन्मान करत 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षिसी रकमेपेक्षा कितीतरी पटीने ही रक्कम अधिक आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. असं असताना 1983 वनडे वर्ल्डकप विजेता संघ आणि 2007 साली टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाला बीसीसीआयने बक्षिसाच्या रुपात किती रक्कम दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
1983 साली कपिल देवच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तेव्हा बीसीसीआय आता इतकं श्रीमंत नव्हतं. त्यावेळेस बीसीसीआयने संघाला फक्त 25 हजार रुपये दिले होते. पण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन करून 20 लाख रुपये जमवले आणि प्रत्येक खेळाडूला 1-1 लाखांची मदत केली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार तेव्हा टीम इंडियाला एकूण 12 कोटी मिळाले होते. म्हणजेच रोहित सेनेला या संघाच्या तुलनेत 10 पट जास्त बक्षिसी रक्कम मिळाली आहे. तसेच आयसीसीकडून ट्रॉफी जिंकल्यानंतर 20.36 कोटी रुपये मिळाले आहेत.
वनडे वर्ल्डकप 2011 जेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 2-2 कोटी रुपये दिले होते. तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना 50 लाख आणि निवड समितीतील सदस्यांना 25-25 लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये मिळाले होते. तसेच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 30 लाख रुपये देण्यात आले होते. आता 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. जर ही स्पर्धा भारताने जिंकली तर किती रक्कम मिळेल, याची आकडेमोड क्रीडाप्रेमी आतापासूनच करत आहेत.
