Duleep Trophy 2024 : शुबमन गिल अडकला अभिमन्यूच्या चक्रव्यूहात, इंडिया ए संघाचा पराभव
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अभिमन्यू ईश्वरन यांच्या नेतृत्वाखालील बी संघाने शुबमन गिलच्या संघाला पराभवाचं पाणी पाजलं. विजयासाठी दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही. संपूर्ण संघ 200 धावांवर बाद झाला. दुसरीकडे, या सामन्यात कर्णधार शुबमन गिल पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी हे संघ आमनेसामने आले होते. इंडिया ए संघाची धुरा शुबमन गिलकडे, तर इंडिया बी संघाची धुरा अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे होती. पहिल्या डावापासूनच इंडिया बी संघ शुबमन गिलच्या संघावर भारी पडला आहे. पहिल्या डावात मजबूत 90 धावांची घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या डाव 184 धावांवर आटोपला तरी आघाडी मिळून 274 धावा झाल्या. तसेच विजयासाठी 275 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान गाठताना इंडिया ए संघाची पडझड झाली. इंडिया ए संघ 198 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि 76 धावांनी पराभव झाला. खरं तर इंडिया बी संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंडिया ए संघाचे दिग्गज खेळाडू स्वस्तात बाद झाले. मयंक अग्रवाल 3, शुबमन गिल 21 आणि रियान पराग 31 धावा करून बाद झाले. मधल्या फळीत केएल राहुलने कडवी झुंज दिली. पण ध्रुव जुरेल आणि तनुष कोटियन यांची साथ काही लाभली नाही. दोघांना आपलं खातं खोलता आलं नाही. तरी केएल राहुल तग धरून होता. सातव्या विकेटपर्यंत त्याने 121 चेंडूंचा सामना केला आणि 57 धावांची खेळी केली.
शिवम दुबे आणि कुलदीप यादवही खास करू शकले नाहीत. दोघेही 14 या वैयक्तिक धावसंख्येवर तंबूत परतले. दुसरीकडे, आकाश दीपने तळाशी येत चांगली झुंज दिली. पण इतर फलंदाज काही तग धरू शकले नाहीत. आकाश दीपने 42 चेंडूत 43 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 4 षटकार मारले. पण धाव घेताना गडबड झाली आणि विकेट देऊन बसला. इंडिया बी संघाकडून दुसऱ्या डावात यश दयालने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर मुकेश कुमारने 2, नवदीप सैनीने 2, वॉशिंग्टन सुंदरने 1 आणि नितीश रेड्डीने 1 गडी बाद केला. या विजयासह इंडिया बी संघाला सहा गुण मिळाले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंडिया बी (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल.
इंडिया ए (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद
