IND vs ENG : ऋषभ पंतनंतर जसप्रीत बुमराहचंही स्पेशल 150, लीड्समध्ये यॉर्कर किंगची ऐतिहासिक कामगिरी
Jasprit Bumrah Milestone : जसप्रीत बुमराह याने हेडिंग्ले लीड्समध्ये पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंड विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने या विकेट्सच्या पंचसह मोठा कारनामा केला. बुमराह सेना देशात अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला 465 धावांवर ऑलआऊट करत 6 रन्सची आघाडी घेतली. या दरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्यानंतर जसप्रीत बुमराह यानेही 150 हा स्पेशल आकडा पूर्ण केला आहे. पंतने ओली पोप याचा कॅच घेतला. पंत यासह कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून 150 विकेट्स पूर्ण करणारा सय्यद किरमानी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतरचा पहिला तर एकूण तिसरा विकेटकीपर ठरला.
जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला ऑलआऊट करण्यात प्रमुख भूमिका बजावली. बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने जोश टंग याला बोल्ड करत इंग्लंडला ऑलआऊट केलं आणि पाचवी विकेट मिळवली. बुमराहने 24.4 ओव्हरमध्ये 83 धावांच्या मोबदल्यात 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने यासह ऐतिहासिक कामगिरी केली. बुमराह या 5 विकेट्ससह सेना देशात (साउथ अफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 150 विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला.
सेना देशात सर्वाधिक विकेट्स घेणारे आशियाई
जसप्रीत बुमराह, 60 डाव, 150 विकेट्स
वसीम अक्रम, 55 डाव, 146 विकेट्स
अनिल कुंबळे, 67 डाव, 141 विकेट्स
इशांत शर्मा, 71 डाव, 130 विकेट्स
बुमराहची फाईव्ह स्टार कामगिरी
⭐⭐⭐⭐⭐ Another five-star show from #JaspritBumrah! 🔥
The pace ace picks up his 12th five-wicket haul (Joint-most by an Indian pacer overseas) outside India wrapping up England’s innings! 🇮🇳🎯
#ENGvIND 1st Test Day 3 LIVE NOW Streaming on JioHotstar 👉… pic.twitter.com/5b2WUEA4Gg
— Star Sports (@StarSportsIndia) June 22, 2025
बुमराहने फक्त 5 विकेट्सच घेतल्या नाहीत तर इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीसही आणलं. बुमराहने इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. बुमराहने झॅक क्रॉलीला आऊट करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर बेन डकेट यालाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. धावांसह विक्रमांचा डोंगर रचणाऱ्या अनुभवी जो रुट यालाही बुमराहने आऊट केलं. बुमराहने ख्रिस वोक्स आणि जोश टंग या दोघांनाही बाद केलं आणि 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.
बुमराहचा विक्रमी ‘पंजा’
दरम्यान बुमराहची इंग्लंडमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. आतापर्यंत टीम इंडियाकडून कुणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 4, इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी 3 तर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी 2-2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.