IND vs ENG : इंग्लंड संघाच्या अडचणींत वाढ, दुसऱ्या कसोटीपूर्वी दोन दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त
भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 ऑगस्टपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान इंग्लंडचा महत्त्वाचा गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉडनंतर आणखी एक दिग्गज दुखापतग्रस्त झाला आहे.

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला एक दिवस शिल्लक असताना इंग्लंड संघावर आणखी एक संकट कोसळलं आहे. आधी महत्वाचा गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉडला (Stuart Broad) दुखापत झाली असतानाच आता सर्वात दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनही (James Anderson) दुखापतीमुळे सामन्याबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
इंग्लंडमधील मीडियाच्या रिपोर्टनुसार, ब्रॉडला मंगळवारी सरावादरम्यान दुखापत झाली. लॉर्ड्स मैदानात वॉर्म अप करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर आता जगातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज असणाऱ्या जेम्सने बुधवारी (11 ऑगस्ट) सरावात सहभाग घेतला नाही. 39 वर्षीय जेम्सच्या पाय अकडल्याने तो सरावाला येऊ शकला नाही. ज्यामुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी तो फिट होण्याची चिन्हे कमी आहेत.
साकिब मेहमूदला संधी मिळणार?
संघातील दोन महत्त्वाचे गोलंदाज संघाबाहेर गेल्याने 24 वर्षीय साकिब मेहमूदला संधी दिली जाऊ शकते. साकिबला ब्रॉडच्या जागी खेळवले जाऊ शकते. या खेळाडूने इंग्लंडकडून आतापर्यंत 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 7 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. ज्यात त्याने 21 विकेटही मिळवले आहेत. तर प्रथम श्रेणी सामन्यात त्याच्या नावावर 65 विकेट्स आहेत. मागील महिन्यातच त्याने पाकिस्तान विरोधात अप्रतिम प्रदर्शन केल्याने त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते.
भारतीय संघातही बदलाची शक्यता
इंग्लंडसह भारतीय संघातही दोन बदल होऊ शकतात. यात पहिला बदल म्हणजे अष्टपैलू शार्दुल ठाकुरच्या जागी आर आश्विनला खेळवले जाऊ शकते. तर दुसरा बदल म्हणून मोहम्मद सिराजच्या जागी अनुभवी इशांत शर्माला खेळवले जाऊ शकते. शार्दुल ठाकुरच्या पायाला हॅमस्ट्रिंग इंजरी झाल्यामुळे त्याची ही दुखापत कधीपर्यंत ठिक होईल हे अद्याप माहित नसल्याने दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अष्टपैलू पर्याय म्हणून आर आश्विनला संधी देण्यात येईल. तसेच इशांत शर्मा याचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चांगला असल्याने त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यासाठी मोहम्मद सिराजला बाहेर ठेवले जाईल.
हे ही वाचा
(England bowler James anderson got an injury after stuart broad doubt for second test against india)
