Test Cricket : इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिजनंतर टीम पुन्हा 5 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक
Test Cricket : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. त्यानंतर आता इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एशेस सीरिजमध्ये 5 टेस्ट मॅचेस खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

टीम इंडियाने 4 ऑगस्टला पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. भारताने पाचव्या सामन्यातील विजयासह इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केला. तसेच इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखलं. टीम इंडियाची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका होती. भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वात या साखळीतील पहिल्याच मालिकेत मन जिंकणारी कामगिरी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीशिवाय आणि जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा ब्रिगेडने अप्रतिम कामगिरी केली.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आता आशिया कप 2025 स्पर्धेच्या हिशोबाने तयारी करत आहे. आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान रगंणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशातील पहिली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली एकूण दुसरी मालिका विंडीज विरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध विंडीज विरुद्ध यांच्यात एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड टीम इंडियानंतर आता थेट नोव्हेंबर महिन्यात आपली पुढील कसोटी मालिका खेळणार आहे.
इंग्लंडसाठी ही मालिका फार प्रतिष्ठेची अशी असणार आहे. प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजनिमित्ताने इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. उभयसंघात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 21 नोव्हेंबर ते 8 जानेवारी दरम्यान या मालिकेचा थरार रंगणार आहे. इंग्लंड या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा या दौऱ्यात चांगलाच कस लागणार आहे.
या मालिकेला अजून फार वेळ आहे. मात्र आतापासूनच या मालिकेची हवा पाहायला मिळत आहे. पॅट कमिन्स या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 21 ते 25 नोव्हेंबर, पर्थ
दुसरा सामना, 4 ते 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरा सामना, 17 ते 21 डिसेंबर, एडलेड
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा सामना, 4 ते 8 जानेवारी, सिडनी
एशेस सीरिजचं काउंटडाऊन सुरु
Countdown for #TheAshes is on 💯👌#WTC27
More 👉 https://t.co/ysc4WwtFSz pic.twitter.com/fbg4uuVAEW
— ICC (@ICC) August 13, 2025
इंग्लंडपुढे सर्वात मोठं आव्हान
दरम्यान एशेस सीरिजमध्ये इंग्लंडसमोर गेल्या 10 वर्षांपासूनची पराभवाची ‘मालिका’ खंडीत करण्याचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने 2015 साली शेवटची एशेस सीरिज जिंकली होती. इंग्लंडला त्यानंतर झालेल्या 4 पैकी 2 मालिकांमध्ये पराभूत व्हावं लागलं. तर इंग्लंडने 2 मालिका बरोबरीत राखल्या. मात्र यंदा ऑस्ट्रेलियात ही मालिका होणार असल्याने इंग्लंडला विजय मिळवणं आव्हानात्मक असणार आहे. इंग्लंड या आव्हानाचा कसा सामना करते? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
