
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिलाच सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चार पैकी तीन सामन्यात विजयी होणार्या संघाला मालिका विजय मिळेल हे स्पष्ट झालं. दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताकडे मालिका विजयाची संधी आहे. चौथ्या टी20 सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 168 धावांचं लक्ष दिलं. खरं तर क्रीडाप्रेमींच्या मते हे लक्ष्य खूपच तोकडं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 119 धावांवरच रोखलं. यासह भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयाचं श्रेय आपल्या संघाच्या स्मार्ट खेळीला दिलं. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने याचा उल्लेख केला. तसेच प्रशिक्षक गौतम गंभीरबाबतही सांगितलं.
सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितलं की, ‘मला वाटतं की या विजयाचं श्रेय फलंदाजांना मिळालं पाहीजे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांची चांगली भागीदारी केली. त्यांना माहिती होतं की 200 किंवा 220 धावांची ही विकेट नाही. त्यामुळे त्यांनी परिस्थितीनुसार खेळणं पसंत केलं. संघाच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिलं.’ टीम इंडियाकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 46 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 21 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार मारत 28 धावा केल्या. अक्षर पटेलने 11 चेंडूत नाबाद 21 धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरबाबत सांगितलं की, ‘मी आणि गौतम गंभीर यांचं एकच म्हणणं होतं की गोलंदाजांनी आक्रमक राहावं. मैदानावर जास्त दव नव्हतं. पण आमच्या गोलंदाजांनी हे गोष्ट जाणली. शिवम दुबेने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने तीन विकेट घेतल्या. टीममध्ये काही षटकं टाकतील असे गोलंदाज असणं आवश्यक आहे. यामुळे फायदाच होतो. हा एक चांगला संघ आहे.’ भारताकडून सर्वच गोलंदाजांनी विकेट घेतल्या. यात वॉशिंग्टन सुंदरने 1.2 षटकात 3 गडी बाद केले. तर अर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्तीच्या वाटेला एक विकेट आली.