Asia Cup 2025 : टी 20I आशिया कपमधील विराट-केएलचा महारेकॉर्ड कोण ब्रेक करणार?
Asia Cup 2025 : आतापर्यंत 2 वेळा टी 20 आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. या टी 20 स्पर्धेत पहिल्या 5 विकेट्ससाठी सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या 10 फलंदाजांबाबत जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेत यावेळेस पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ एक्शन मोडमध्ये असणार आहेत. बदललेल्या नियमांमुळे एसीसी प्रीमियर स्पर्धेतून 1 ऐवजी 3 संघ आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरले. तर इतर 5 संघांनी आयसीसी रँकिंगच्या जोरावर प्रवेश मिळवला. या 5 संघांमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. तर हाँगकाँग, यूएई आणि ओमान या 3 संघांनी पात्रता फेरीतून आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलंय. ओमानची या स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. या 8 संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागलं आहे.
आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील सामने 20 ओव्हरचे असणार आहेत. टी 20 आशिया कप स्पर्धेची यंदाची तिसरी वेळ असणार आहे. याआधी 2016 आणि 2022 साली आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने खेळवण्यात आली होती. टीम इंडियाच्या विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने 2022 मध्ये एक विक्रम केला होता. तो विक्रम यंदा ब्रेक करण्याची संधी आहे. विराट-केएलचा रेकॉर्ड कुणी ब्रेक करु शकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
केएल-कोहलीचा विराट रेकॉर्ड
टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वात मोठ्या सलामी भागीदारीचा विक्रम हा विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांच्या नावावर आहे. विराट आणि केएल या दोघांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरुद्ध 119 धावांची सलामी भागीदारी केली होती. विराटने त्या सामन्यात शतक केलं होतं. विराट यासह टी 20 आशिया कप स्पर्धेत शतक लगावणारा भारताचा पहिला आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला होता. भारताने त्या सामन्यात विजय मिळवला होता. विराट-केएल व्यतिरिक्त टी 20 आशिया कप स्पर्धेत आणखी 4 मोठ्या पार्टनरशीपबाबत आपण जाणून घेऊयात.
दुसऱ्या विकेटसाठीची पार्टनरशीप
पाकिस्तानसाठी फखर जमा आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी 2 सप्टेंबर 2022 रोजी शारजाहमध्ये हाँगकाँग विरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली होती.
विराट आणि सूर्यकुमारचा झंझावात
टी 20 आशिया कप स्पर्धेत तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या जोडीने 31 ऑगस्ट 2022 रोजी हाँगकाँग विरुद्ध 98 धावांची भागीदारी केली होती.
पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शोएब मलिक आणि उमर अकमल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 29 फेब्रुवारी 2016 रोजी नाबाद 114 रन्सची पार्टनरशीप केली होती.
पाकिस्तानच्या सर्फराज अहमद आणि शोएब मलिक या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 2 मार्च 2016 रोजी 70 धावांची भागीदारी केली होती.
