‘305 धावांचं आव्हान भारताने सहज कसं गाठलं?’, इंग्लंडचा दिग्गज खेळाडू भडकला
भारताने टी20 मालिकेत 4-1 असा धुव्वा उडवल्यानंतर तशीच स्थिती आता वनडे मालिकेतही झाली आहे. भारताने वनडे मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 305 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताने 4 गडी आणि 33 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. यामुळे इंग्लंडच्या माजी खेळाडूने संताप व्यक्त केला आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या मनासारखं झालं आणि नाणेफेकीचा कौल पदरात पडला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इतकंच काय 49.5 षटकात सर्व गडी गमवून 304 धावा केल्या आणि विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान सोपं नव्हतं. पण भारताने हे आव्हान 6 गडी गमवून 44.3 षटकात पूर्ण केलं. भारताने हे आव्हान सहज गाठल्याने इंग्लंडचा माजी विकेटकीपर बॅटर मॅट प्रायरने कर्णधार जोस बटलरला खडे बोल सुनावले आहेत. टीएनटी स्पोर्ट्शी बोलताना 42 वर्षीय प्रायर यांनी इंग्लंडच्या पराभवानंतर जोस बटलरची खरडपट्टी काढली. खरंच भारतीय संघ दबावाखाली होता का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ‘मला वाटतं की भारताने 305 धावांचं लक्ष्य सहज गाठलं हा चिंतेचा विषय आहे. समजू शकतो त्यांनी काही विकेट शेवटी गमावल्या. परंतु ते खेळ संपवण्याचा प्रयत्न करत असताना ते कंटाळवाणे होते.’ इतकंच काय तर इंग्लंडचे गोलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर हतबल दिसून आले.
“वुड जलद गोलंदाजी करतो पण या विकेटवर ते पुरेसे नाही. तुम्हाला अचूक राहावे लागेल, योग्य कामगिरी करावी लागेल आणि फलंदाजांवर दबाव आणावा लागेल. इंग्लंडकडे रोहितला अडचणीत आणण्याचा कोणताच प्लान नव्हता” असं प्रायर पुढे म्हणाला. “वेग वाढवा, वेग वाढवा, वुड जोरदार गोलंदाजी करत होता. पण इंग्लंडने जे काही प्रयत्न केले, त्याचा रोहितने पलटवार केला. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याने आक्रमक आणि उत्कृष्ट खेळी खेळली.”, असंही प्रायर म्हणाला.
इंग्लंडच्या संघात समन्वयाचा अभाव असल्याची टीका प्रायरने केली. “इंग्लंडने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. सलामी भागीदारी चांगली झाली. मधल्या फळीत रूटने मोर्चा सांभाळला. परंतु ते एक संघ म्हणून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाहीत. संघ कुठे आहे हे त्यांच्या क्षेत्ररक्षणावरून कळू शकते आणि काही चुका झाल्या आहेत.”, अशी टीकाही प्रायर यांनी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. आता तिसरा सामना औपचारिक असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तिसरा वनडे सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल.
