WTC 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचणार? उर्वरित नऊ सामन्यात असं असेल समीकरण
Team India WTC 2027 Final Scenario: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 स्पर्धा अर्थात स्पर्धेचं चौथं पर्व सुरू आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचे कसोटी मालिका गमावल्यान भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. पण उर्वरित नऊ सामन्यात असं समीकरण जुळवावं लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत टीम इंडियाने चांगली सुरूवात केली आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 ने गमावली. त्यामुळे भारताचं चौथ्या पर्वात अंतिम फेरी गाठण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यत भारताने 4 सामन्यात विजय, 4 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे. अशा स्थितीत आता उर्वरित नऊ सामन्यात चांगली कामगिरी करणं भाग आहे. कारण आता विजयी टक्केवारी 48.15 असून गुणतालिकेत टॉप 2 मध्ये जागा मिळवणं कठीण आहे. पण उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी केली तर हे लक्ष्य गाठणं सोपं आहे. भारताचे 9 सामने शिल्लक आहे.
आयपीएलनंतर भारताचा पहिला दौरा श्रीलंकेला असणार आहे. या मालिकेत 2 सामने खेळणार आहे. या मालिकेवर भारताचं पुढचं गणित अवलंबून असणार आहे. त्यानंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. दोन्ही संघात पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली जाईल. भारताने नऊ पैकी नऊ सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 74.1 होईल आणि अंतिम फेरी गाठणं सोपं होईल. पण असं गणित जुळून येणं कठीण आहे.
भारताला टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी नऊ पैकी किमान सहा सामने जिंकणं भाग आहे. पण दावा मजबूत पणे ठोकण्यासाठी 7 किंवा विजय आवश्यक आहे. टीम इंडियाने 7 सामन्यात विजय, एक सामना गमवला आणि एक सामना बरोबरीत सोडवला तर विजयी टक्केवारी 64.8 टक्के होईल. दुसरीकडे, 6 सामन्यात विजय, 2 ड्रॉ आणि एक सामना गमावला तर विजयी टक्केवारी 61.1 टक्के होईल. तर सहा सामन्यात विजय, एक ड्रॉ आणि दोन सामने गमावले तर विजयी टक्केवारी 59.3 टक्के होईल. अशा स्थितीत भारताला काहीही करून सात सामने जिंकणं भाग आहे. कारण विजयी टक्केवारी 65 टक्क्यांच्या आसपास राहील.
करो या मरोची स्थिती
भारतीय क्रिकेट संघाला आता प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती असा असणार आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात प्रत्येक सामना आता अंतिम फेरीसारखा खेळावा लागणार आहे. नाही तर न्यूझीलंड किंवा दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे भारताला 9 पैकी किमान 7-8 सामने जिंकावे लागतील. भारताची पहिली परीक्षा श्रीलंकेविरुद्ध असेल. त्यानंतर न्यूझीलंडचा कठीण पेपर असणार आहे. या दोन्ही देशात भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.