T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला संधी! आयसीसीने टाकले नवे फासे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण पाकिस्तानकडून अजूनही ड्रामेबाजी सुरू आहे. स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतचा निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, आयसीसीने प्लान बी रेडी ठेवला असून बांगलादेशला संधी देण्याची रणनिती आखली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशची नाटकं सुरू आहेत. यात बांगलादेशच्या नाटकाचा शेवट झाला. त्यानंतर पाकिस्तानचा बहिष्काराचा खेळ सुरू झाला आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अजूनही स्पर्धेत खेळायचं की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे मोक्याच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेण्याची योजना पाकिस्तानची आहे. 26 जानेवारीला पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली. या बैठकीत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा मुद्दा ठेवला गेला. याबाबतचा निर्णय शुक्रवारपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ या सामन्यावर बहिष्कार टाकणार असेल तर त्यांना स्पर्धेतून बाहेर केलं जाईल. त्यांच्या जागी बांगलादेशला संधी दिली जाईल.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानची भूमिका पाहता आयसीसी अलर्ट मोडवर आली आहे. पाकिस्तानने असं काही केल्यास त्यांच्या जागी बांगलादेशला संधी दिली जाईल. म्हणजेच अ गटात पाकिस्तानची जागा बांग्लादेश घेईल. रिपोर्टनुसार, ‘जर पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली तर बांगलादेशला त्यांच्या जागी संधी दिली जाईल. कारण त्यांना सर्व सामने हे भारताऐवजी श्रीलंकेत खेळायचे आहेत.’ बांगलादेशला या स्पर्धेतून बाहेर करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना सर्व सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळायचे होते. आयसीसीला मोक्याच्या क्षणी वेळापत्रकात बदल करणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करत स्कॉटलंडला संधी दिली गेली.
बांगलादेशला बाहेर केल्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा राजकीय केला आहे. पाकिस्तान देखील आता आडमुठी भूमिका घेत आहे. त्यासाठी आयसीसीने प्लान बी रेडी ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला सामना होणार आहे. या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची योजना पाकिस्तानने आखली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, असं करणं खूपच कठीण आहे. कारण त्याचे वाईट परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भोगावे लागतील. पाकिस्तान क्रिकेट संघावर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाकिस्तानचं कृत्य आयसीसी नियमांचं उल्लंघन मानलं जाईल. पाकिस्तानला वर्ल्डकप आणि आशिया कप सारख्या स्पर्धेतून निलंबित केलं जाऊ शकतं.
