IND vs BAN : जडेजाचं एक वाक्य आणि अश्विनला झाला फायदा, खेळ संपला तेव्हा काय झालं ते सांगितलं
आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने पहिला दिवस गाजवला. दोघांनी 195 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला तारलं. यावेळी आर अश्विनने शतक ठोकलं. मात्र या शतकामागे मैदानात नेमकं काय घडलं ते त्याने सांगितलं. रवि शास्त्री यांच्याशी सामन्यानंतर बोलला तेव्हा त्याने याचा खुलासा केला.
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दिग्गज फलंदाज फेल ठरले तिथे आर अश्विनने शतकी खेळी केली. पहिल्या सत्रात बांगलादेशचा पारडं जड होतं. 144 धावांवर 6 गडी तंबूत परतले होते. त्यामुळे नाजूक स्थिती पाहून 200 धावाही होतील की नाही याबाबत शंका होती. पण आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने बांगलादेशला झुंजवलं. 339 धावांवर 6 गडी अशा आश्वासक स्थितीवर आणून सोडलं. आर अश्विनने यावेळी त्याच्या कसोटी कारकिर्दितलं सहावं शतक ठोकलं. आर अश्विनने चार शतकं वेस्ट इंडिजविरुद्ध, एक शतक इंग्लंड आणि एक शतक बांगलादेशविरुद्ध ठोकलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आर अश्विन नाबाद 102 धावांवर खेळत होता. तर रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आर अश्विनने सांगितलं की शतकी खेळीपर्यंत पोहोचण्यास जडेजाचं एक वाक्य कारणीभूत ठरलं.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आर अश्विनने रवि शास्त्री यांच्यासोबत बातचीत केली. यावेळी त्याने शतकी खेळी करण्यास रवींद्र जडेजाने मदत केल्याचं सांगितलं. अश्विनने सांगितलं की, ‘एक वेळ अशी आली होती की थकवा वाटत होता. तेव्हा जडेजा मदतीला आहे. त्याने सांगितलं की दोन धावांना तीन धावात बदलण्याची गरज नाही. या फॉर्म्युलामुळे फायदा झाला.’ चेन्नईत टीएनपीएलचे टी सामने खेळलो होतो. त्यामुळे फलंदाजीवर विश्वास होता. ज्या पद्धतीची खेळपट्टी चेन्नईत आहे तेव्हा ऋषभ पंतच्या शैलीत धावा करण्याचा निर्णय घेतला.अश्विनने फक्त 58 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर पुढच्या 50 चेंडूत शतक पूर्ण केलं. 108 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने त्याने शतक पूर्ण केलं.
आर अश्विन आठव्या स्थानावर उतरून 4 शतकं ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये डॅनियल विटोरीने 8व्या स्थानावर उतरत अशी कामगिरी केली आहे. कामरान अकमलने 3 शतकं ठोकली आहे. इतकंच नाही तर अश्विन सर्वात जास्त वयाचा कसोटी शतक ठोकणआर चौथा भारतीय फलंदाज आहे. अश्विनने 38 वर्षे आणि 2 दिवसाचा असताना कसोटी शतक ठोकलं आहे. विजय मर्चंटने 40 वर्षे आणि 21 दिवसांचा असताना हा विक्रम केला आहे.