IND vs BAN: बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात कुणाला मिळणार संधी?
India vs Bangladesh Test Series: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने होणार आहेत. बांगलादेश या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची सीरिज ठरणार आहे. टीम इंडिया या साखळीत आतापर्यंत 9 पैकी 6 विजयासह 74 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे टीम इंडियाचा बांगलादेशचा धुव्वा उडवून अव्वल स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.
उभयसंघातील मालिकेला अजून महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी आहे. मात्र त्यानंतरही या मालिकेसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाही? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्रांतीवर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी कुणाला संधी मिळणार अशीही चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापतीमुळे दूर असणारा मोहम्मद शमी या मालिकेतून कमबॅक करणार असल्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा या जोडीचं कमबॅक होण्याची तीव्र शक्यता आहे. पंतला संधी मिळाल्यास तो अपघातानंतर पहिल्यांदाच कसोटी संघात परतेल. पंतने अखेरचा सामना हा 2022 साली बांगलादेश विरुद्धच खेळला होता. तर जडेजाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू हे सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहेत. मात्र यामधून कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराह याच्या जागी आवेश खान/खलील अहमद यांच्यापैकी वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला संधी मिळते, याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल. तर फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विन आणि युझवेंद्र चहल यापैकी कुणाला संधी मिळणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 19-23 सप्टेंबर, एमए चिदंबरम स्टेडियम
दुसरा सामना, 27 सप्टेंबर-1 ऑक्टोबर, कानपूर
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, शिवम दुबे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.
