Video : रवींद्र जडेजाच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला 47 धावांचा फटका, झालं असं की..
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात दोन्ही बाजूने तगडी खेळी होताना दिसत आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली आहे.

भारत आणि इंग्लंड या सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर इंग्लंडच्या खेळाडूंनी पकड मिळवली असं म्हणायला हरकत नाही. कारण भारताने 471 धावा केल्या असल्या तरी शेवटच्या 7 विकेट या 41 धावांवर पडल्या. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक करून दिलं. हा खेळ इतक्यावरच थांबला नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी तोडीस तोड उत्तर दिलं. बेजबॉल पॅटर्नने खेळी करत 150 धावाही गाठल्या आहेत. अवघ्या 4 धावांवर पहिली विकेट पडली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या बेन डकेट आणि ओली पोपने डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. बेन डकेट्स आणि ओली पोप या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. बेन डकेट्स 94 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने क्लिन बोल्ड केलं. पण ही विकेट तो 15 धावांवर असतानाच पडली असती. रवींद्र जडेजाची चूक भारताला महागात पडली आणि 47 धावांचा भुर्दंड भरावा लागला.
इंग्लंडचा डावखुरा ओपनर बेन डकेट डावाच्या सातव्या षटकात जसप्रीत बुमराहचा सामना करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने बॅकवर्ड प्वाइंटच्या दिशेने फटका मारला. हा फटका खालून मारण्यात डकेटला अपयश आलं होतं. तसेच फिल्डिंगमध्ये माहीर असलेल्या रवींद्र जडेजाच्या हातात चेंडू गेला. त्याने उजव्या बाजूला उडी मारली आणि हातात झेल आला. पण त्याला हा झेल पकडण्यात अपयश आलं. रवींद्र जडेजाच्या हातून हा झेल सुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण जडेजा हा जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे.
#RavindraJadeja #INDvsENGTest pic.twitter.com/3aMFqrTper
— ABHISHEK PANDEY (@anupandey29) June 21, 2025
फिल्डिंगमध्ये निराश केलेल्या रवींद्र जडेजाची बॅटिंगही काही खास नव्हती. रवींद्र जडेजा फक्त 11 धावा करून तंबूत परतला. खरं तर त्याच्याकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र त्याला अपयश आलं. जोश टंगच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड होत तंबूत परतला. शुबमन गिलला खरं तर अष्टपैलू रवींद्र जडेजाकडून फार अपेक्षा आहेत. आता गोलंदाजीत काय कमाल करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
