
टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सूर्याचं सातत्याने अपयशी होणं हे चिंताजनक होतं. मात्र सूर्याने एका खेळीसह या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लावला. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध 23 जानेवारीला दुसऱ्या टी 20i सामन्यात चाबूक खेळी केली. सूर्याने स्फोटक अर्धशतकासह न्यूझीलंड विरुद्ध भारताला विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. सोबतच सूर्याने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. सूर्याने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 15.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कॅप्टन सूर्याने नाबाद 82 धावा करत 468 दिवसांची प्रतिक्षा संपवली.
सूर्याने रायपूरमध्ये 37 बॉलमध्ये नॉट आऊट 82 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी अपयशी ठरली. दोघेही बाद झाल्याने भारताची स्थिती 2 आऊट 6 अशी झाली होती. मात्र त्यानंतर सूर्याने इशान किशन आणि शिवम दुबे या दोघांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी करत भारताला विजयी केलं.
सूर्याने इशानसह तिसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 122 रन्सची वादळी भागीदारी केली. सूर्याने इशान आऊट झाल्यानंतर शिवम दुबे याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 37 चेंडुत नाबाद 81 धावांची भागीदारी करत भारताला जिंकवंलं. इशानने 76 तर शिवमने 36 धावा केल्या.
सूर्याने या नाबाद खेळीदरम्यान अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सूर्याच्या टी 20i कारकीर्दीतील हे 22 वं शतक होतं. सूर्याने यासह तब्बल 23 डावांनंतर हे टी 20i अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने याआधी 12 ऑक्टोबर 2024 रोजीअर्धशतक झळकावलं होतं. मात्र त्यानंतर सूर्याला 2025 मध्ये धावांसाठी झगडावं लागलं. सूर्याला 2025 मधील 21 सामन्यांमध्ये फक्त 218 धावाच करता आल्या. मात्र सूर्याने रायपूरमधील एका खेळीसह सर्व हिशोब केला.
सूर्यकुमार यादव याने टी 20i क्रिकेटमध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याबाबत अभिषेक शर्मा याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सूर्याने रायपूरमधील अर्धशतकासह ही कामगिरी केली. सूर्याची ही 25 पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याची आठवी वेळ ठरली.