IND vs NZ : टीम इंडिया नववर्षात पहिल्या मालिकेत किती सामने खेळणार? पाहा वेळापत्रक
India vs New Zealand Odi Series 2026 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची समजली जात आहे. या मालिकेतील सामने कुठे पाहता येणार? जाणून घ्या

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2025 वर्षातील शेवटची टी 20i मालिका जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया नववर्षात 2026 मधील पहिल्याच आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड या 2 मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडच्या या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र अद्याप (2 जानेवारी) एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा लागून आहे. या मालिकेतील सामने कधी आणि कुठे पाहता येतील? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
भारत-न्यूझीलंड एकदिवलीय मालिका
उभयसंघातील पहिला सामना हा 11 जानेवारीला बडोद्यात खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना 14 जानेवारीला रोजकोटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना 18 जानेवारीला इंदूरमध्ये पार पडणार आहे. या तिन्ही सामन्यांना एकाच वेळेस सुरुवात होणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू 1 वाजून 30 मिनिटांनी टाकण्यात येईल. तर 1 वाजता टॉस उडवण्यात येईल.
भारत-न्यूझीलंडपैकी वरचढ कोण?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 120 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 120 पैकी 62 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने भारताच्या तुलनेत 10 सामने कमी जिंकले आहेत. न्यूझीलंडने भारतावर 52 सामन्यांमध्ये मात केली आहे. उभयसंघातली 7 सामन्यांचा निकाल लागला नाही. तर 1 सामना हा बरोबरीत सुटला.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 11 जानेवारी,बीसीएस स्टेडियम बडोदा,
दुसरा सामना, 14 जानेवारी, निरंजन शाह स्टेडियम, राजकोट
तिसरा सामना, 18 जानेवारी, होळकर स्टेडियम, इंदूर
सामने टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लॅपटॉप आणि मोबाईलवर लाईव्ह सामन्यांचा थरार अनुभवता येईल.
रोहित-विराटकडे लक्ष
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं न्यूझीलंड विरुद्ध कमबॅक होणार आहे. दोघेही अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळले होते. दोघांसाठी आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची असणार आहे. अशात रोहित आणि विराट ही अनुभवी जोडी या मालिकेत कशी कामगिरी करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
