AI द्वारे PM मोदींचा व्हिडिओ-ऑडिओ एडिट करणं भोवलं, पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ/ऑडिओ एडिट आणि व्हायरल केल्याबद्दल एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याची कसून चौकशी देखील सुरू आहे.

गेल्या काही काळापासून एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियावर अनेक लोक वेगवेगळे व्हिडिओ तयार करत असतात. यातील जवळपास सगळे व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवलेले असतात. मात्र काही व्हिडिओ आक्षेपार्ह असतात. अशातच आता सोशल मीडियावर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ/ऑडिओ एडिट आणि व्हायरल केल्याबद्दल एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याची कसून चौकशी देखील सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधानांचा एआय व्हिडिओ तयार करणं भोवलं
समोर आलेल्या माहितीनुसार, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव/फोटो/आवाज वापरून व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. 2 जानेवारी 2026 रोजी या व्हिडिओची माहिती मिलाल्यानंतर एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न
या कृत्रिमरित्या तयार केलेल्या व्हिडिओ/ऑडिओचा उद्देश जनतेमध्ये गोंधळ पसरवणे, देशातील सर्वोच्च संवैधानिक कार्यालयांची प्रतिष्ठा आणि विश्वास कमी करणे, लोकशाही संस्थांमध्ये अविश्वास निर्माण करणे आणि सामाजिक सौहार्द आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणे हा होता. अशा प्रकारच्या बनावट डिजिटल सामग्रीद्वारे देशविरोधी भावना, अफवा आणि सामाजिक अशांतता पसरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकाला अटक
या व्हिडिओची संवेदनशीलता लक्षात घेता, मुझफ्फरपूरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस उपअधीक्षक (सायबर) यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. तांत्रिक मुद्द्यांवर आधारित पुरावे गोळा केल्यानंतर स्थापन केलेल्या पथकाने घटनेत सहभागी असलेल्या प्रमोद कुमार राज, राहणार भगवानपूर बोचाहान, जिल्हा-मुझफ्फरपूर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून चौकशीला सुरूवात
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांचा व्हिडिओ तयार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक फोनही ताब्यात घेण्यात आलेला आहे. सध्या पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.
