IND vs SA : टी 20 मालिकेसाठी ऑलराउंडरची एन्ट्री फिक्स! टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार?
India vs South Africa T20i Series 2025 : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 ते 19 डिसेंबर दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी 3 डिसेंबरला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या कसोटीनंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. त्यानंतर टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली. उभयसंघात एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेत 5 सामने होणार आहेत. या मालिकेला अवघे काही दिवस बाकी आहेत. टी 20i सीरिज 9 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मलिकेसाठी भारतीय संघाची केव्हा घोषणा होणार? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय संघ केव्हा जाहीर करणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी 20i मालिकेसाठी 3 नोव्हेंबरला टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच काही खेळाडूंचं कमबॅक होण्याची अधिक शक्यता आहे. टीम इंडियाने अखेरची टी 20i मालिका ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला या मालिकेत 2-1 ने पराभूत केलं होतं.
हार्दिक पंड्या याचं कमबॅक फिक्स
अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून टी 20i टीममध्ये कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. हार्दिकला टी 20 आशिया कप स्पर्धेत दुखापत झाली होती. तेव्हापासून हार्दिक टीममधून बाहेर आहे. हार्दिकचं कमबॅक झाल्यास टीम इंडियाच्या बॅटिंग आणि बॉलिंगला बुस्टर मिळेल.
ऋतुराज गायकवाड याला संधी मिळणार?
हार्दिक व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल या दोघांचं कमबॅक होऊ शकतं. ऋतुराज गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20 टीममधून बाहेर आहे. ऋतुराजने विंडीज विरुद्ध 2024 साली अखेरची टी 20i मालिका खेळली होती. तसेच ऋतुराजने दक्षिण आफ्रेकिविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून कमबॅक केलं आहे. त्यामुळे निवड समिती ऋतुराजवर विश्वास दाखवत टी 20i संघातही संधी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
शुबमन गिल याचं कमबॅक होणार का?
टी 20 टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याचंही कमबॅक होण्याची शक्यता आहे. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे आता कुणाला संधी मिळते? हे लवकरच स्पष्ट होईल.
