IND vs SA : वनडेनंतर आता टी 20I मालिकेचा थरार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
India vs South Africa T20i Series 2025 : आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतात होणारी ही मालिका दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची आहे. मालिकेतील पहिला सामना हा 9 नोव्हेंबरला होणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यात दणक्यात सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश केलं. त्यानंतर टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात 2023 नंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेबाबत सर्वकाही जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी
सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मार्रक्रम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. टी 20I मालिकेचं आयोजन हे 9 ते 19 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20I सीरिजमधील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20I सीरिजमधील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20I सीरिजमधील सामने मोबाईलवर कुठे पाहता येतील?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20I सीरिजमधील सामने मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येतील.
सामन्यांच्या वेळेत बदल
उभयसंघातील एकदिवसीय सामन्यांना दुपारी दीड वाजता सुरुवात व्हायची. तर 1 वाजता टॉस व्हायचा. मात्र आता टी 20 सामने आहेत. त्यामुळे या सामन्यांना संध्याकाळी सुरुवात होणार आहे. सामन्याला 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात येईल.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 9 डिसेंबर, कटक, बाराबती स्टेडियम
दुसरा सामना, 11 डिसेंबर, मुल्लानपूर
तिसरा सामना, 14 डिसेंबर, धर्मशाला
चौथा सामना, 17 डिसेंबर, लखनौ
पाचवा सामना, 19 डिसेंबर, अहमदाबाद
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं कमबॅक
दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I सीरिजद्वारे टीम इंडियात ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं कमबॅक झालं आहे. हार्दिक पंड्या याला टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. हार्दिक तेव्हापासून टीम इंडियातून बाहेर होता. हार्दिकला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20I सीरिजला मुकाव लागलं. मात्र आता हार्दिक कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.
