
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं (Icc T20i World Cup 2026) काउंटडाऊन सुरु झालं आहे. फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर जानेवारीतील पहिल्या 2 आठवड्यात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. तसेच यंदा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाकडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सरावाच्या दृष्टीने फक्त 6 टी 20I सामने आहेत.
टीम इंडिया नववर्षात न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात 5 सामन्यांची टी 20I मालिका (India vs New Zealand 2026) खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया शुक्रवारी 19 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा आणि अंतिम टी 20I सामना खेळणार आहे. हा सामना टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याच्यासाठी फार निर्णायक असणार आहे.
संजूला या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. उपकर्णधार शुबमन गिल याला झालेल्या दुखापतीमुळे संजू अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित या सामन्यात खेळताना दिसणार आहे. संजूसाठी आगामी टी 20I वर्ल्ड कपआधी शेवटची संधी असल्याचं म्हटलं जात आहे.
संजूला गेल्या सलग 6 टी 20I सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. त्यापैकी 1 सामना हा धुक्यांमुळे रद्द करण्यात आला. तर अहमदाहबादमध्ये शुबमन नसल्याने त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत संजूला खेळण्याची संधी मिळेल का? याची खात्री नाही. त्यामुळे संजूसाठी हा पाचवा सामना निर्णायक आणि महत्त्वाचा असा ठरणार आहे.
शुबमनमुळे संजू सॅमसन याच्यावर अन्याय झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संजू आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने गेल्या वर्षभरात टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र शुबमनला ओपनिंगला खेळता यावं यासाठी संजूला तडजोड करावी लागली. संजूला मधल्या फळीत बॅटिंगसाठी यावं लागलं. संजूचे मिडल ऑर्डरमधील आकडे चांगले नाहीत. त्या आकड्यांच्या जोरावर संजूला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आलं. त्यामुळे आता संजूला या पाचव्या आणि अंतिम सामन्यात मोठी खेळी करुन दाखवावी लागणार आहे. त्यामुळे संजूसाठी हा सामना अखेरची संधी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.