IND vs WI: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल, कोचने दिली हिंट
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका 2-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. असं असताना टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नेमकं काय ते जाणून घ्या

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची कसोटीत चांगली कामगिरी सुरु आहे. इंग्लंडसारख्या कठीण दौऱ्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. इंग्लंडला 2-2 ने बरोबरीत रोखलं. आता भारताची वेस्ट इंडिविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 10 ऑक्टोबरपासून होत आहे. हा सामना जिंकून वेस्ट इंडिजला व्हाइटवॉश देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापू्र्वी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान डोशेट यांनी मोठी हिंट दिली आहे. त्यामुळे संघात काही ना काही बदल होणार हे मात्र नक्की झालं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन फेल गेला होता. त्याच्या जागी कोणाला घेतात? की जसप्रीत बुमराहला आराम देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोशेट म्हणाले की, ‘आम्ही संघात फार काही बदल करू इच्छित नाही. पण आमचं ध्येय टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू विकसित करणं आहे. कारण आम्ही जेव्हा विदेशात खेळतो तेव्हा आमच्याकडे त्या स्थानावर खेळण्यासाठी खेळाडू आहे हे तपासणे महत्त्वाचे ठरते. गेल्या सामन्यात नितीश रेड्डीवर फार लक्ष केंद्रीत केलं नव्हतं. म्हणून त्याला एक संधी दिली पाहीजे. यामुळे संघाचे बॅलेन्स बिघडणार नाही. नितीश हा एक चांगला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.’ नितीश कुमार रेड्डीला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत नितीश रेड्डीला अधिक संधी देऊ शकतो. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग असून पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याला आराम देऊन प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते.वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या साई सुदर्शनला वगळले जाऊ शकते. त्यामुळे शुबमन गिल कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. अन्यथा विजयी टक्केवारीवर परिणाम होईल.
