IND vs WI : टीम इंडिया व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज, विंडीज सलग दुसऱ्या विजयापासून रोखणार का?
India vs West Indies 2nd Test : शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताने पहिल्या सामन्यात धमाकेदार विजय साकारला. आता टीम इंडिया सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिलाच सामना अडीच दिवसात जिंकला. भारताने पाहुण्या संघावर एकतर्फी विजय मिळवला. भारताने वेस्ट इंडिजवर डाव आणि 140 धावांनी विजय साकारला. भारताने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. भारताचा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीत मायदेशातील पहिलावहिला विजय ठरला.
त्यानंतर आता शुबमनसेनेला वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा आणि अंतिम सामना जिंकून मायदेशात 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. तर वेस्ट इंडिजसमोर भारताला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे. मात्र विंडीजला त्यासाठी कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. मात्र विंडीजची कामगिरी पाहता तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. विंडीजला पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात 200 पारही मजल मारता आली नाही. त्यामुळे विंडीज दुसर्या सामन्यात पहिल्या सामन्यातील चुका दुरुस्त करुन टीम इंडियाला आव्हान देणार का? याकडे लक्ष असणार आहे.
दुसरा सामना कधी आणि कुठे?
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना हा शुक्रवारी 10 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (आधीचं फिरोजशाह कोटला) करण्यात आलं आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
विंडीज वरचढ मात्र भारताचा दबदबा
उभयसंघातील कसोटी क्रिकेटमधील आकडे पाहता विंडीज भारतावर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. मात्र गेल्या अडीच दशकांपासून टीम इंडिया विंडीजवर वरचढ राहिली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 101 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. भारताला या 101 पैकी फक्त 24 सामने जिंकता आले आहेत. तर विंडीजने भारताच्या तुलनेत 6 सामने जास्त जिंकले आहेत. विंडीजने भारतावर 30 कसोटी सामन्यांमध्ये मात केली आहे. तर दोन्ही संघातील 47 सामने हे बरोबरीत राहिलेत. त्यामुळे आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकून विंडीज विरुद्धची आकडेवारी आणखी सुधारणार की पाहुणा संघ मालिकेत बरोबरीत साधणार? यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
