IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा वैभव सूर्यवंशीचा धमाका, फक्त 58 चेंडूतच ठोकलं शतक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धूमधडाका दिसला. त्याने अवघ्या चेंडूत शतक ठोकलं. इतकंच काय तर मागच्या काही वर्षात सूर्यवंशी अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अंडर 19 क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. भारताने वनडे मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप दिला होता. त्यानंतर कसोटी मालिका सुरु झाली. पहिल्याच कसोटीत भारताचा वरचष्मा दिसला आहे. चार दिवसीय कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला.ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच पहिल्या डावात 293 धावांवर ऑलआऊट झाला. या धावांचा पाठलाग करताना विहान मल्होत्रा आणि वैभव सूर्यवंशी यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. 18.5 षटकांचा सामना करत या दोघांनी 133 धावांची भागीदारी केली. तर एकट्या वैभव सूर्यवंशीने 62 चेंडूत 104 धावांची खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने 58 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचा टी20 अंदाज पाहायला मिळाला. अंडर 19 क्रिकेटमधील भारताकडून सर्वात वेगवान शतकाचा मान त्याला मिळाला आहे.
अंडर 19 क्रिकेटमधील हे दुसरं वेगवान शतक आहे. इंग्लंडचा मोईन अली या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2005 मध्ये 56 चेंडूत शतक ठोकलं होतं. मोईन अली हा विक्रम फक्त दोन चेंडूमुळे वाचला. वैभव सूर्यवंशी भारताचं भविष्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. फक्त 13 वर्षात वैभव सूर्यवंशी रणजी ट्रॉफी, हेमंत ट्रॉफी, कूच बिहार ट्रॉफी आणि वीनू मांकड ट्रॉफी खेळला आहे. मागच्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याचं वय 12 वर्षे आणि 284 दिवस इतकं होतं. त्याने युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांचा सर्वात कमी वयात रणजी खेळण्याचा विक्रम मोडीत काढला होता.
वैभव सूर्यवंशीने चांगली सुरुवात करून दिली असली तर मधल्या फळीतील डाव गडगडला. दोन जणांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर तीन जणं एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाने 293 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात भारताने 296 धावा केल्या आणि 3 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 110 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 3 कमी करता 107 धावांची आघाडी आहे. अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.