IND vs WI : सुनील गावस्कर Live सामन्यादरम्यान काय बोलून गेले? सोशल मीडियावर संतापाची लाट
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिला दिवस टीम इंडियाच्या फलंदाजांनी गाजवला. यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे, सुनील गावस्कर यांच्या वक्तव्याने वादळ उठलं आहे.

भारत वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. संघाच्या 58 धावा असताना केएल राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. पण त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजचे गोलंदाज विकेटसाठी पुरते हतबल झाल्याचं पाहायला मिळाले. पण सर्व काही टीम इंडियाच्या बाजूने सुरु असताना सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना वापरलेले शब्द क्रीडाप्रेमींच्या मनाला भिडले. त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. सुनील गावस्कर यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर रान उठलं आहे. सुनील गावस्कर यांच्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूची खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे. सुनील गावस्कर यांनी सामना सुरु असताना समालोचन करताना टेविन इमलाचची खिल्ली उडवली. नेमकं काय झालं ते समजून घ्या.
सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?
भारत वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यात इयान बिशप आणि सुनील गावस्कर समालोचन करत होते. यावेळी वेस्ट इंडिजच्या टेविनची खिल्ली उडवली गेली. खरं तर असं वागणं सुनील गावस्कर यांना शोभणारं नाही असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. गावस्कर यांनी बिशप यांना विचारलं की, ‘बिशप मी तुला विचारू इच्छितो की, टेविन वेस्ट इंडिजमध्ये विचित्र नाव आहे. टेविन इमलाच, हाहाहाहा… ज्या लोकांनी या खेळाडूचं नाव ठेवलं ते बोबडे तर नव्हते ना.. ते त्याचं नाव केविन तर ठेवू इच्छित नव्हते ना..’ सुनील गावस्करने केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. क्रीडाप्रेमींनी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. इतकंच काय त्यांना कॉमेंट्री पॅनेलमधून दूर करण्याची मागणी केली आहे.
Atleast now can we sack him from commentary duty? Man literally insulted an opposition player and mocked him https://t.co/JPAQwslDFx
— The Stats Kid (@TheStatsKid1523) October 10, 2025
सुनील गावस्कर यांची अशा प्रकारे वक्तव्य करण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबाबत अशीच कमेंट केली होती. त्यावरून खूपच वाद झाला होता. दरम्यान, सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुनील गावस्कर यांनी याबाबत थेट इयान बिशप यांनाच प्रश्न विचारला की, नव्या चेंडूने वेस्ट इंडिजचे गोलंदाज बाउंसरचा वापर का करत नाहीत. यावर बिशप यांनी काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने बिशप यांनी सांगितलं की, कदाचित तुम्ही पुढे सील्सकडून तशा प्रकारची गोलंदाजी पाहू शकता.
