भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला असा विजय, 77 वर्षांचा दुष्काळ संपला
भारताने इंग्लंडमध्ये घुसून इंग्रंजांना कसोटीत लोळवलं आहे. खरं तर ही मालिका बरोबरीत सुटली. पण असं असलं तरी भारताच्या दृष्टीने हा मोठा विजयच आहे. पाचव्या कसोटी सामन्यात भारताने फक्त 6 धावांनी विजय मिळवला आणि 77 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रोमहर्षक झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला होता. कारण इंग्लंडला पाचव्या दिवशी 35 धावांची गरज होती आणि हातात 4 विकेट होत्या. त्यामुळे इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार आणि अनेकांना आशा सोडल्या. पण मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्रंजांनी नांगी टाकली. हा सामना भारताने अवघ्या 6 धावांनी जिंकला. यासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या विजयासह भारताने 77 वर्षांची दीर्घ प्रतीक्षाही संपुष्टात आणली आहे. हा विजय भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा ठरला. कारण इतक्या वर्षानंतर भारताने अशी कामगिरी केली आहे. या विजयामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने मान मिळाला आहे. शुबमन गिल भले नाणेफेक गमवत असेल. पण मालिका बरोबरीत सोडवण्याची धमक आहे.
भारताने विदेश दौऱ्यावर असताना पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने यापूर्वी 16 वेळा विदेशात कसोटी मालिका खेळल्या. पण प्रत्येक वेळी शेवटच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण यावेळी तसं काही झालं नाही. भारताने ओव्हल मैदानात इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या मालिकेत भारतीय सं 1-2 ने पिछाडीवर होता. पण चौथा सामना ड्रॉ आणि पाचवा जिंकून दाखवला. शेवटच्या दिवशी इंग्लंडकडे एकूण 4 विकेट होत्या. त्यापैकी 3 विकेट या एकट्या मोहम्मद सिराजने घेतल्या. तर एक विकेट मिळवण्यात प्रसिद्ध कृष्णाला यश आलं. या सामन्यात मोहम्मद सिराजने 9 आणि प्रसिद्ध कृष्णाने 8 विकेट घेतल्या.
दरम्यान, कसोटीत इतक्या कमी फरकाने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2004 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 13 धावांनी विजय मिळवला होता. 1972 मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकात्यात 28 धावांनी, तर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेटमध्ये 31 धावांनी विजय मिळवला होता. एकेरी धावांनी विजय आणि तोही भारताबाहेर पहिल्यांदा मिळवला आहे.दुसरीकडे, इंग्लंडने भारताविरुद्ध 4-1 ने शेवटची कसोटी मालिका 2018 मध्ये जिंकली होती.
