भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली, पण हार्दिक पांड्याने बोलून दाखवली खंत; म्हणाला..
भारताने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरलं आहे. टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या स्पर्धेत सर्वच खेळाडूंचं योगदान राहिलं आहे. हार्दिक पांड्यानेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या विजयानंतर हार्दिक पांड्याने आपलं मन मोकळं केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवट टीम इंडियाने विजयाने केला. मागच्या एका महिन्यापासून हा या स्पर्धेचा थरार सुरु होता. भारत या स्पर्धेत अजिंक्य राहिला. साखळी फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत भारताने सर्व सामन्यात विजय मिळवला. भारताने यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं होतं. आता 12 वर्षानंतर टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2017 मध्ये भारताकडे जेतेपदाची संधी चालून आली होती. पण तेव्हा पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी धुव्वा उडवला होता. आता त्या पराभवाची जखम टीम इंडियाने 2025 मध्ये भरून काढली आहे. या विजयानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या याने मन मोकळं केलं आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाबाबत मनातलं बोलून दाखवलं.
हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आयसीसी स्पर्धा जिंकणे नेहमीच अद्भुत असते, विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफी. 2017 या वर्षी जे काही घडलं त्याची खदखद माझ्या मनात होती. त्यावेळी आम्ही काम पूर्ण करू शकलो नाही. यावेळी सर्वांनी योगदान दिले याबद्दल आनंद झाला.केएल राहुल हा हुशार, शांत, संयमी आहे त्याने योग्य वेळी संधी मिळवल्या. केएल राहुलमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, मला वाटत नाही की कोणीही त्याच्यासारख्या चेंडूला मारू शकेल.’
जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भारताच्या वेगवान गोलंदाजीचा रथ हार्दिक पांड्याने ओढला. मोहम्मद शमी सामन्याची सुरुवात करत होता. तर हार्दिक पांड्या त्याला साथ देत होता. हार्दिक पांड्याने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. कधी गोलंदाजीत तर फलंदाजीत भारताला संकटातून बाहेर काढलं. अंतिम सामन्यात सामना जर तर वर येऊन ठेपला होता. तेव्हा हार्दिकने आक्रमक फटकेबाजी केली. 18 चेंडूत 1 चौकार आणि षटकार मारत शेवट प्रेशर हलकं केलं. त्याच्या 18 धावांमुळे भारतीय संघ विजयाच्या जवळ आला.
