Virat Kohli | विराट-सौरव गांगुली वाद टोकाला, कोहलीने दादासोबत असं नक्की काय केलं?
विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वादाचा नवा अंक क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. हस्तांदोलन प्रकरणानंतर विराट कोहली याने टीम इंडियाच्या 'दादा'सोबत असं नक्की काय केलं? जाणून घ्या

मुंबई | विराट कोहली आणि सौरव गांगुली, टीम इंडियाचे माजी आणि आक्रमक कर्णधार. गांगुलीने टीम इंडियाला भिडायला आणि लढायला शिकवलं. तर विराटने प्रतिस्पर्धी संघांना बॅटने उत्तर कसं द्यायचं हे दाखवून दिलं. या दोन्ही कर्णधारांनी आपली कारकीर्द गाजवली. टीम इंडियाला एका उंचीवर आणून ठेवलं. मात्र सध्या हे दोन्ही माजी कर्णधार आमनेसामने आले आहेत. या दोघांमध्ये जुंपली आहे. विराट आयपीएल स्पर्धेत आरसीबी टीमकडून खेळतोय. तर सौरव गांगुली हा दिल्ली कॅपिट्ल्स टीममध्य कोचिंग टीमचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान विराटने गांगुलीला कॅच घेतल्यानंतर रोखून पाहिलं होतं. विराटने कॅच घेतल्यानंतर डगआऊटमध्ये बसलेल्या गांगुलीकडे कटाक्ष टाकला होता. तसेच विराटने सामन्यानंतर हस्तांदोलन करणं ही टाळलं होतं. त्यानंतर विराटने आता गांगुली विरुद्ध आणखी मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
नक्की काय झालंय?
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली याने सौरव गांगुलीला सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यांच म्हटलं जात आहे. विराट याआधी गांगुलीला फॉलो करत होता, मात्र या वादानंतर त्याने अनफॉलो केल्याचं विविध रिपोर्टसमध्ये म्हटलं जात आहे.
नक्की प्रकरण काय?
सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना या दोघांमध्ये खटके उडाले होते. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना विराट टीम इंडियाचं तिन्ही फॉरमेटमध्ये नेतृत्व करायचा. विराटने 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपनंतर सांगितल्यानुसार कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर विराटला एकदिवसीय कर्णधारपद सोडण्यास भाग पाडलं होतं.
विशेष बाब म्हणजे तत्कालिन कर्णधार विराट आणि तत्कालिन बीसीसीआय अध्यक्ष या दोघांच्या प्रतिक्रियेत विसंगती दिसून येत होती. कर्णधारपद सोडण्याबाबत आमचं विराटसोबत बोलणं झाल्याचं गांगुलीने म्हटलं होतं. तर मला नेतृत्व सोडावं लागणार याबाबत काही तासांपूर्वीच माहित झालं होतं, अशी प्रतिक्रिया तेव्हा विराटने दिली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये 36 चा आकडा तयार झाला होता.
विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाला तब्बल 10 वर्षांनी पूर्णविराम मिळाला. दोघांमधील वाद संपतो ना संपतो आता विराटच्या निशाण्यावर गांगुली आला आहे. त्यामुळे विराट-गांगुली यांच्यातील दादागिरी कधीपर्यंत सुरु राहणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
दरम्यान आयपीएल 16 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. विराट कोहली विरुद्ध महेंद्रसिंह धोनी असा हा थेट सामना असणार आहे.
