IPL 2024, MI vs RCB : मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 7 विकेट्सनी मात, दुसऱ्या विजयाने असा झाला फायदा
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. आरसीबीने विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 7 विकेट्स राखून गाठलं. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली. तसेच सूर्यकुमार यादवने त्यावर कळस चढवला

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला चांगली लय सापडली आहे. स्पर्धेत सलग तीन पराभव सहन केल्यानंतर आता सलग दुसरा विजय मिळवला आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 8 गडी गमवून 196 धावा विजयासाठी दिल्या होत्या. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून पूर्ण केलं. तसेच 27 चेंडू शिल्लक ठेवल्याने रनरेटमध्येही जबरदस्त फायदा झाला. इशान किशनने 34 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. तर रोहित शर्माने 24 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. यावेळी रोहित शर्माने वानखेडेवर षटकारांचं शतक ठोकलं आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने तर आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 18 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा विजय निश्चित झाला होता.
मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने सर्वोत्तम स्पेल टाकला. 4 षटकात 21 धावा देत 5 गडी बाद केले. त्यामुळे आरसीबीच्या धावांना खऱ्या अर्थाने लगाम लागली. तर गेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी एक गडी बाद केला. आकाश मढवाल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 1 गडी बाद करत 57 धावा दिल्या.
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 7 गडी आणि 27 चेंडू राखून पराभूत केल्याने गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्सने थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाब किंग्सला मागे टाकलं आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे प्रत्येकी चार गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत मुंबई इंडियन्स सरस ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे प्लेऑफची वाट आणखी बिकट झाली आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्स होणार आहे. हा सामना 14 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
