विजयानंतर आरसीबीने उडवली पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची खिल्ली, ट्वीट करत लिहिलं की..
आयपीएल जेतेपदाचं स्वप्न आरसीबीने 17 वर्षानंतर आणि 18व्या पर्वात सत्यात उतरवलं. अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा 6 धावांनी धुव्वा उडवला आणि विजयश्री खेचून आणला. यानंतर आरसीबीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून श्रेयस अय्यरवर निशाणा साधला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचं पहिल्या जेतेपदाचं स्वप्न फक्त 6 धावांनी हुकलं. सामन्यावर मजबूत पकड असताना मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्या आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला रोखलं आणि पहिलं जेतेपद मिळवलं. या विजयानंतर आरसीबी चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. क्वॉलिफायर 1 आणि अंतिम फेरीत दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. दोन्ही वेळेस आरसीबी संघ पंजाब किंग्सवर भारी पडला. क्वॉलिफायर 1 मध्ये पंजाब किंग्सला पराभूत करून आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा श्रेयस अय्यरने सांगितलं होतं की, हा दिवस कधी विसरणार नाही. आम्ही लढाई हरलो आहोत युद्ध नाही. पण अंतिम सामन्यातही आरसीबीने पंजाब किंग्सला पराभवाची धूळ चारली. आरसीबीने एक पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट चर्चेत आहे.
अंतिम सामना जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने श्रेयस अय्यरच्या वक्त्यव्याच्या संदर्भ घेत ट्विट केले आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला डिवचल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. तसेच रजत पाटीदारचा एक फोटो शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनवर लिहिले की, ‘आम्ही सर्व लढाया आणि युद्धही जिंकलं आहे.’ अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला 20 षटकात 7 गडी गमावून 184 धावा करता आल्या.
WE’VE WON ALL THE BATTLES AND THE WAR. ✊ pic.twitter.com/CekgZ89iso
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2025
श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईचं तर रजत पाटीदारने मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं होतं. यावेळी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने मध्य प्रदेशचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे अंतिम फेरीत श्रेयस अय्यर हा रजत पाटीदारवर भारी पडेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. उलट अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर बाद झाला आणि सामना आरसीबीच्या पारड्यात झुकला. आरसीबी देखील आता विजेत्या संघाच्या यादीत समाविष्ट झाली आहे. पुढच्या हंगामात आरसीबीचा जोश दुप्पट होणार यात काही शंका नाही.
