GT vs RR : गुजरातविरुद्धच्या सामन्यात राजस्थानला मोठा झटका, मॅचविनर ऑलराउंडर’आऊट’
Gujarat Titans vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार संजू सॅमसन याने फिल्डिंगचा निर्णय घेत यजमान गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता गुजरात या संधीची फायदा घेत किती धावसंख्या उभारते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
राजस्थानला मोठा झटका
गुजरातविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सला मोठा झटका लागला आहे. राजस्थानला नाईलाजाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करावा लागला आहे. राजस्थानचा मॅचविनर ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याने वैयक्तिक कारणामुळे या सामन्यातून माघारी घेतली आहे. त्यामुळे संघात वानिंदूच्या जागी अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकी याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गुजरातने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
गुजरात राजस्थानवर वरचढ
दरम्यान आयपीएलच्या इतिहासात आकडेवारी पाहता गुजरात राजस्थानवर वरचढ राहिली आहे. उभयसंघातील हा सातवा सामना आहे. त्याआधी झालेल्या 6 पैकी 5 सामन्यात गुजरातने राजस्थानवर मात केली आहे. तर फक्त एकदाच राजस्थानला विजयी होता आलं आहे. तसेच गुजरातची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर त्यांनी सलग तिन्ही सामने जिंकले. त्यामुळे गुजरातला राजस्थानवर मात करत विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसर्या बाजूला राजस्थाननेही सलग 2 सामने गमावल्यानंतर तितकेच सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थानकडे विजयी हॅटट्रिकची संधी आहे. त्यामुळे आता कोणती टीम विजयी होते? याकडे साऱ्यांचं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.
