MI vs RR : वैभव सूर्यवंशीबाबत ट्रेंट बोल्टचं मोठं विधान, म्हणाला की…
भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये सध्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची जोरदार चर्चा होत आहे. कारण त्याने वयाच्या 14व्या वर्षी मोठी कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे एकीकडे त्याची स्तुती होत असताना दुसरीकडे विचित्र चर्चाही होत आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याच्याबाबत विधान केलं आहे.

राजस्थान रॉयल्स संघ मागच्या तीन सामन्यापासून वैभव सूर्यवंशी नावाचं अस्त्र सलामीला वापरत आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात म्हणजेच गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण कमी वयात आणि भारतीय खेळाडूने ठोकलेलं सर्वात वेगवान शतक होतं. अवघ्या 14 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. तेही दिग्गज गोलंदाजांचा सामना करत 11 षटकार मारले. एका पाठोपाठ एक अनेक विक्रम त्याच्या नावावर झाले आहे. भविष्यात एखाद्या खेळाडूला हे विक्रम मोडून काढणं कठीण आहे. कारण इतक्या कमी वयात तसं पाहीलं तर ते शक्य नाही. त्यामुळे सर्वत्र वैभवच्या नावाची चर्चा होत आहे. ट्रेंट बोल्टने सांगितलं की, मी माझ्या करिअरमध्ये जगभरातील काही चांगल्या फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. यात ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्सचा समावेश आहे. संपूर्ण जगाने वैभवची कामगिरी त्या रात्री पाहीली आहे. इतक्या कमी वयात ही चांगली कामगिरी होती. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. सर्व खेळाडू बाहेर पडतात आणि कोणत्याही संधीचे सोने करतात आणि मला वाटते की वैभवने ते काम खरोखरच चांगले केले. दरम्यान, 14 वर्षांच्या वैभवची अजिबात काळजी नाह, असंही ट्रेंट बोल्ट पुढे म्हणाला.
बॉक्सर विजेंदर सिंह काय म्हणाला?
असं असताा काही जणांनी वैभवच्या वयावर संशय घेतला आहे. भारताचा ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर सिंहने या तरूण खेळाडूवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. बॉक्सर विजेंदर सिंहने आपल्या एक्स खात्यावर व्यंगात्मक पोस्ट करत लिहिलं की, ‘भाई, आज काल वय कमी दाखवून क्रिकेटमध्येही खेळू लागले.’ विजेंदर सिंहची ही पोस्ट वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीच्या दोन दिवसानंतर आली आहे. त्यामुळे त्याने नाव जरी घेतलं नसलं तरी नेटकरी त्याचा संबंध वैभव सूर्यवंशीसोबत जुळवत आहेत. वय कमी दाखवून खेळण्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. विजेंदर सिंहने तोच धागा पकडून या पद्धतीने पोस्ट केल्याची चर्चा आहे.
Bhai aaj kal umar choti ker ke cricket me bhe khelne lage 🤔
— Vijender Singh (@boxervijender) April 30, 2025
वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध 37 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकार मारून 101 धावा केल्या. टी20 क्रिकेट आणि आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. आता वैभव सूर्यवंशी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज आहे. मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर असे दिग्गज गोलंदाज आहेत. मोहम्मद सिराज आणि इशांत शर्माला दणका दिल्यानंतर आता या दिग्गज गोलंदाजांचा सामना कसा करतो? याकडे लक्ष असेल. कारण गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने त्याला यॉर्कर चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला होता. जसप्रीत बुमराह यॉर्कर किंग आहे आणि त्याचा सामना कसा करतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
